थकबाकीदार ग्राहकांचा जनमित्रांवर हल्ला;वर्धा आणि भंडारा येथील घटना

0
11

गोंदिया,दि. २८:- थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्रांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या असून यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्धा येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यावर ब्लेडने गालावर वार  करून त्याला रक्तबंबाळ करण्यात आले.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर कार्यालय क्रमांक-२ येथे कार्यरत असलेले जनमित्र दीपक जठरे  हे बुधवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी आपले सहकाऱ्यांसह सिंदी (मेघे) येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. संकेत डंभारे या वीज ग्राहकाने देयकाचे पैसे भरण्यास नकार देऊन कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात संकेत डंभारे याने महावितरणचे जनमित्र दीपक जठरे यांच्यावर  ब्लेडने हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत दीपक जत्रे यांच्यावर वर्धा येथे उपचार करण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून महावितरणच्या वतीने रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महावितरणचे वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे यांनी जखमी कर्मचाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दुसरी घटना भंडारा शहरात घडली. भंडारा उत्तर शहर कार्यालयात कार्यरत सहाय्यक  अभियंता अजय उमप हे आपले सहकारी कार्तिक बोरकर आणि संदीप मगरे यांना सोबत घेऊन मालेवर कॉलनी. प्रगती नगर येथील थकबाकीदार वीज ग्राहक श्रीमती प्रभा लांजेवार यांच्याकडेबुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास  गेले. घटनेच्या वेळी प्रभा लांजेवार यांचा मुलगा अमर लांजेवार घरी होता. त्याने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्यासोबत वादावादी केली. तसेच हल्ला करून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून महावितरणकडून भंडारा पोलीस स्थानकात तक्रार दिल्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.