गावातील अवैध दारु विक्री बंद करा

0
23

रावणवाडी(गोंदिया)दि.29 : गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनके कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.तसेच गावातील अवैध दारु विक्री बंद न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे,जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल, रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात सरपंच सुजित येवले, तिलकप्रसाद भगत, जैपाल पारधी, हिरा सोनवाने, ममता बिसेन, आचल बिसेन, वर्षा बिसेन,छबू बिसेन व गावातील महिलांचा समावेश आहे.
अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याने गावातील वातावरण कलुषीत होत आहे. त्यामुळे गावातील अवैध दारु विक्री व अवैध धंदे बंद करण्यात यावे. अशी मागणी गावातील महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गोंदिया तालुक्यातंर्गत येणाऱ्या रावणवाडी येथे पोलीस स्टेशन आहे. मात्र यानंतर मागील काही दिवसांपासून गावातील अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे. गावात दारुची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना दारुचे व्यसन जडत असल्याचे चित्र आहे. मोल मजुरी करुन जगणाऱ्या कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. घरातील कर्ता पुरुष दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचे कुटुंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. तर गावातील भांडण तंट्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांना याबाबत वांरवार निवेदन देऊन सुध्दा अवैध दारु विक्रीला आळा बसला नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात पूर्णपणे दारु बंदी करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी प्रशासनाकडे महिलांनी केली आहे.