नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेला ‘गजराज’ बेफाम, १ महिला ठार

0
36

यवतमाळ,दि.03 – नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने एका महिलेला ठार केल्याची घटना चहांद गावात घडली. बेफाम झालेल्या या हत्तीने एका व्यक्तीलाही गंभीर जखमी केले. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.वन विभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला होता. मंगळवारी रात्री भुकेने व्याकुळ ‘गजराज’ने लोखंडी साखळी तोडून पळ काढला. हा हत्ती नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबातून आणण्यात आला होता. रस्त्याने नासधूस करत हा हत्ती कॅम्पपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चहांद गावात पोहचला. यावेळी हत्तीने शौचास गेलेल्या अर्चना मोरेस्वर कुलसंगे (३० ) या महिलेला चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला.चहांदनंतर हा हत्ती पोहना गावात पोहोचला. तेथेही त्याने एका व्यक्तीला जखमी केले. भुकेने व्याकूळ हत्तीने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. गावातील घरांचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यानंतर वडकी हिंगणघाटच्या जवळील राष्ट्रीय महामार्गाने जात असतांनी हत्तीला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्तीवर उपचार करुन त्याला जेरबंद केले. केळी आणि चारा देऊन त्याला शांत करण्यात आले. या हत्तीला आता पुन्हा चंद्रपूर येथील ताडोबा अभयारण्यात पाठवण्यात आले आहे.