स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहोचवा : दोनोडे

0
31

सालेकसा,दि.03: स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय स्वच्छता अभियानात शाश्वतता टिकवून ठेवणे शक्य नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची आपली जबाबदारी पार पाडली तर स्वच्छता मोहिम राबविण्याची गरज पडणार नसल्याचे मत व्यक्त करून स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता दोनोडे यांनी केले.

सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथे १ ऑक्टोबर रोजी पर्यटन स्थळाची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सालेकसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना राऊत होत्या. यावेळी जि.प.सदस्य दुर्गा तिराले, विजय टेकाम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, पशुधन विकास अधिकारी राजेश वासनिक, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वैरागकर, पं.स.चे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, सरपंच कैलाश धमाडे, डॉ. गुप्ता आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते..

महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. गावातील स्वच्छता निरंतर ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम यांनी केले. आपल्या आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने आता स्वच्छतेची धुरा आपल्या हातात घेतली. संतांनीसुद्धा स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यामुळे बदल घडविण्यासाठी आता संतांचे विचार अंगीकारा असे आवाहन जि.प. सदस्य दुर्गा तिराले यांनी केले. स्वच्छता म्हणजे शिस्त, स्वच्छता आत्मसात करायला कठीण आहे. मात्र, देशात आता स्वच्छतेची चळवळच निर्माण झाली आहे. त्याची सुरुवातच अंगणवाडीपासून झालेली असल्याने येणारा काळा समृद्ध होणार असल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक यांनी व्यक्त केले. शौचालयाच्या निर्मितीमुळे आता गावातील आजारात प्रचंड घट झालेली आहे. आता स्वच्छतेत शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेण्याचे मत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे यांनी सर्वांना स्वच्छता शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच कैलाश धमाडे यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी एस.एस. निमजे यांनी केले. तर आभार सुरेंद्र खोब्रागडे यांनी मानले. पं.स.चे साहाय्यक प्रशासन अधिकारी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. वराडपांडे, गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्वच्छताग्रही, अशासेविका, आरोग्य सेवक, सेविका, वनसमितीचे सदस्य तथा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. .