पादचारी रस्त्यावरील अतिक्रमण हटताच प्रशासकीय इमारतीने घेतला मोकळा श्वास

0
69

गोंदिया,दि.04ः- शहरातील जयस्तंभ चौकातील तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरु झालेली आहे.त्यासाठी इमारतीसमोरील सुरक्षाभिंतीला लागून असलेल्या पादचारीरस्त्यावर अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात आली होती.ती दुकाने हटविण्याची मोहीम बुधवार (दि.३) ला राबविण्यात आली.त्यासाठी अतिक्रमणधारक फुटपाथ दुकानदारांना आधीच महसुल विभागाच्यावतीने नोटीस देण्यात आलेली होती.त्यांनतरही बसस्थानकाला लागून असलेल्या एका अतिक्रमणधारकाने पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे व महुसलच्या अधिकार्यांशी हुज्जत घालत कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.या परिसरातील अवैध अतिक्रमणासह अवैधरित्या लावण्यात येत असलेले होर्डींगसही हटविण्यात आल्याने या नव्या इमारतीने मोकळा श्वास घेतला आहे.नागरिकांनी सुध्दा या भव्य इमारतीची शोभा कायम ठेवण्यासाठी त्या परिसरात अतिक्रमण न करण्याचा संकल्प घेतल्यास हा चौक एक चांगला चौक म्हणून उद्यास येऊ शकणार आहे.
शहरातील मध्यभागी असलेल्या जुनी तहसील कार्यालय तोडून त्या ठिकाणी तहसील कार्यालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. या इमारतीत सर्वच प्रकारचे कार्यालय राहणार आहेत. ही इमारत तयार होऊन वर्ष झाले व कार्यालयाचे पूर्ण कामही आटोपले आहे. अशातच आजपासून तहसील कार्यालयाच्या परिसरातील व आजु-बाजुचा अतिक्रमण हटविण्याला सुरुवात करण्यात आली.नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा येत्या 15 दिवसाच्या आत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
नवनिर्मित तहसील कार्यालय इमारतीच्या सुरक्षा भिंत बांधकामामध्ये अडसर येत असलेल्या जयस्तंभ बसस्थानका जवळचे अतिक्रमण काढण्याची मोहीम शहर पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. दरम्यान बसस्थानक नजिकच्या फुटपाथ वरील एका दुकानदारास दुकान हटविण्याची सलग दोन तास विनंती करण्यात आली. मात्र मोहिमेत आडकाटी आणत असल्याने पोलिसांनी त्याला आपले सर्व प्रकरण पोलिस ठाण्यात येऊन मांडावे, असे सांगितले त्यावरही त्याने पोलिसांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी त्याला वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो व त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला. त्यातच आपण पत्रकार आहो म्हणून तुम्ही ही कारवाई करू शकत नाही, असा दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न एका वृत्त पत्राच्या संपादकाने केला. ऐवढेच नव्हे, तर पोलिसांच्या कारवाईत अडथडा निर्माण केला. एकंदरीत या मोहिमेला गालबोट लावण्याचे काम पुन्हा झाले. या प्रकरणी फियार्दी मंडळ अधिकारी बळीराम भेंडारकर यांच्या तक्रारीवरून जगदीश शिवराम जगने (३४), अनुसया शिवराम जगने (५७), सत्यशिला राकेश मोहके (२८), मोनु ठाकूर (४0) यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथडा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.