लाच घेणारा कोतवाल गजाआड

0
5

भंडारा,दि.05ः- वनविभागाकडून वृक्षतोडीसाठी परवानगी लागणारी केस तयार करण्यासाठी शेतकर्‍यांकडून २ हजारांची लाच स्वीकारणार्‍या कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
मनोज चंदन गोस्वामी (५६) असे अटक करण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील कोतवालाचे नाव आहे. तक्रारदाराने ग्राम माडगी येथील चार शेतकर्‍यांकडून सागवन व आंब्याचे झाड विकत घेऊन त्या झाडाची कापणी करण्याकरिता वनविभागाची परवानगी लागणारे दस्ताऐवज मिळण्याकरिता तलाठी कार्यालयातील कोतवाल गोस्वामी यांना दिले. कोतवालांनी चारही शेतकर्‍यांचे केसचे कागदपत्रे तयार करण्यासाठी प्रत्येकी ८00 रुपये असे ३२00 रुपयांची मागणी केली. त्यापैकी १२00 रुपये त्यांना देण्यात आले. दरम्यान, एका शेतकर्‍याच्या शेतशिवारातील सागवन व आंब्याच्या झाडाचे परवानगी मिळण्याचे कागदपत्रे दिले व उर्वरित तीन शेतकर्‍यांच्या कामासाठी तक्रारदारांनी भेट घेतली असता कोतवालाने २ हजाराच्या लाचेची मागणी केली. तसेच न दिल्यास कादगपत्रे तयार करून देणार नाही, अशी धमकी दिली. लाचेची रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान सापळा रचला असता आरोपी मनोज गोस्वामी यांनी तक्रारदार चार शेतकर्‍यांकडून २ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. आरोपीविरुद्ध अड्याळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश्‍वर पारधी करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, नागपूरचे अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, शिपाईशेखर देशकर, अश्‍विनकुमार गोस्वामी, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.