‘हमसफर एक्सप्रेस’ उदघाटन सोहळ्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी

0
15

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.५:– येथून सुरु होणाऱ्या हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी या ‘हमसफर एक्सप्रेस’ रेल्वे गाडीचा उद्घाटन सोहळा विद्यमान खासदारांना तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे न देता भाजपने घाईघाईत उरकून टाकल्याबद्दल शुक्रवारी नांदेड रेल्वेस्थानकावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. तर दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार करत गोंधळातच या गाडीला हिरवा कंदील दाखवला.

श्री हुजूर साहिब नांदेड ते जम्मू तवी एक्सप्रेस रेल्वेगाडी शुक्रवारपासून सुरु झाली. केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल यांच्या हस्ते नांदेड रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी या रेल्वे गाडीच्या उद्घाटनाचा सोहळा घाईघाईत आटोपून टाकण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव काँग्रेसने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. नांदेडचे विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. ‘नरेंद्र मोदी हाय हाय’, ‘दादागिरी नही चलेगी’ या घोषणांनी रेल्वेस्थानकाचा परिसर दणाणून गेला. यावेळी प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. या गोंधळातच मंत्री हरसिमरतकौर व गुरुव्दारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. नांदेडच्या प्रवाशांसाठी तसेच सचखंड गुरुव्दाराच्या दर्शनासाठी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली येथून येणाऱ्या यात्रेकरुंसाठी ही गाडी सुरु करण्यात आली आहे. याचा मला आनंद असल्याचे सांगून प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी देखील काँग्रेसकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात गोंधळाचीच परिस्थिती होती आणि या गोंधळातच हा कार्यक्रम आटोपला. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.

नांदेड ते जम्मू काश्मीरला जाण्या येण्याकरिता नांदेड येथून रेल्वेची सोय नव्हती. सचखंड गुरूद्वारा पवित्र स्थानाचा दर्शनासाठी येणाऱ्या व अमरनाथ वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ही गाडी सुरु झाल्याने मोठी सोय झाली आहे. गुरूद्वारा बोर्डाने ही रेल्वे सुरू व्हावी म्हणून रेल्वे बोर्डाकडे बराच पत्रव्यवहार  करून पाठपुरावा केला आणि त्यास यश आले. गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी सरदार डी. पी. सिंघ चावला व अधिक्षक सरदार गुरविंदरसिंघ वाधवा यांनी ही माहिती दिली. सायंकाळी साडेचार वाजता या नवीन गाडीला केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल यांनी झेंडा दाखवला. बादल या विशेष विमानाने नांदेडला आल्या. त्यांनी सचखंड गुरुव्दारात जावून दर्शन घेतले. त्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ केला.

दर शुक्रवारी नांदेडच्या रेल्वेस्थानकावरुन ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी पूर्णा येथे 5.20 वाजता, वसमत 6.10 वाजता, हिंगोली 6.56 वाजता, वाशिम 7.45 वाजता, अकोला रात्री 9.50 वाजता, मलकापूर रात्री 11.08 वाजता तर इटारसी येथे 10.40 वाजता, हबीब गंज येथे रात्री सव्वाबारा वाजता, वीणा येथे सकाळी 2.38 वाजता, झाशी येथे सकाळी 4.50 वाजता, ग्वालेर येथे सकाळी 6.10 वाजता, आग्रा येथे सकाळी सव्वानऊ वाजता, मथूरा येथे सकाळी 10.10 वाजता, नवी दिल्ली येथे दुपारी 1.15 वाजता, अंबाला येथे दुपारी 4.35 वाजता, लुधियाना येथे सायंकाळी 6.20 वाजता, जालंधर येथे रात्री 7.15 वाजता, पठाणकोट येथे 9.17 वाजता तर जम्मूतावी येथे रात्री 11.30 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रविवारी ही गाडी सकाळी 7.25 वाजता जम्मूतावी स्थानकावरुन सुटेल आणि ती याच मार्गावरुन सोमवारी रात्री 8.45 वाजता हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहचेल.