कालव्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

0
11

पवनी,दि.06ः- गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून इंजिनच्या सहाय्याने शेतीला पाणी देत असताना तोल गेल्याने शेतकर्‍याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोमनाळा बु. येथे घडली. पुरुषोत्तम टेंभूर्णे (५0) रा. कोंढा असे या शेतकर्‍याचे नाव आहे.सोमनाळा येथील तरुणांनी पुरुषोत्तम यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपास पोलिस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुरुषोत्तम यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
सध्या धानाचे पीक गर्भावस्थेत असून, पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु, पावसाने दगा दिल्यामुळे पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहेत. कोंढा येथील शेतकरी पुरुषोत्तम टेंभूर्णे यांची २ एकर शेती सोमनाळा शिवारात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याला लागून आहे. शुक्र वारी सकाळी पुरुषोत्तम यांनी शेतावर पाण्याचे डिझेल पंप आणले. ते पंप डाव्या कालव्यावर लावले. पंपाद्वारे काही तास पाणी फेकल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड आला. तेव्हा पुरुषोत्तम यांनी कालव्यात उतरून फुटबॉल हलवून बघत असताना त्यांचा तोल गेल्याने ते कालव्यात पडले. कालव्यात १५ ते २0 फू ट पाणी आल्याने ते वाहत गेले. शेजारच्या शेतकर्‍यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले.