आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची धानोलीला भेट

0
19

सालेकसा ,दि.07ः-: मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे रस्त्याची समस्या सुटणार असल्याचे दिसत आहे. धानोली ते बाम्हणी दरम्यान वाघनदी वाहत असून या नदीवरील पुलाचे बांधकाम करीत पक्का रस्ता बनविल्यास परिसरातील अनेक गावांतील लोकांना आमगावकडे जाणे सोपे व सोयीचे होणार. परंतु धानोली परिसरात बाम्हणीकडे जाणाऱ्या रस्त्याचा सुमारे ५०० मीटर भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. हा रस्ता पक्का बनविण्यासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नाही. येथील लोकांनी शेकडोवेळा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आमदार पुराम यांनी वारंवार पत्र व्यवहार केला. त्यानुसार जिल्हाधिकारी बलकवडे यांनी आमदार पुराम यांच्यासह थेट त्या स्थळालाच भेट दिली. त्यांच्यासोबत उप विभागीय अधिकारी सुनील कोरडे, तहसीलदार सी.आर.भंडारी, गावातील रतन टेंभरे, भरत पटले व इतर गावकरीही उपस्थित होते.