मोदी-फडणवीस सरकार हाय हाय चे नारे; काँग्रेसचे आंदोलन

0
12
मुलचेऱ्यातील मुख्य चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारविरुद्ध घोषणा देत शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले. तहसील कार्यालयाजवळ सभा झाली. या सभेला मार्गदर्शन करताना वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मोदी-फडणवीस सरकारने शेतकऱयांचा भ्रमनिरास केला आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
आमदार विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, की गायीसाठी शेतकऱ्यांना जीव द्यावा लागत आहे. गायीच्या पालणपोषणासाठी शेतकऱ्यांच्या हाती दमडी नाही. अशा स्थितीत जनावरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना पकडले जात आहे. जनावरे विकू नका, असे भाजप व आरएसएस सांगत आहे. मात्र, किती भाजप व आरएसएस कार्यकर्त्यांकडे गायी व म्हशी आहेत, याचा शोध घ्या. वयोवृद्ध जानवरे हे भाजप व आरएसएसवाल्यांच्या घरी नेऊन बांधा आणि त्यांनाच त्या जनावरांचा सांभाळ करायला सांगा. तेव्हाच जनावरांच्या मागे शेतकऱयाला काय त्रास होतो, हे त्यांना कळेल, असे ते म्हणाले.

यावेळी तालुक्यातील मुख्य मार्गांची दुरुस्ती करावी, वाढते वीज बिल व अंदाजे पाठविण्यात येणारे वीज बील बंद करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, निराधार योजनेचे अनुदान वाढवावे, मुलचेरा येथे नवीन बसस्थानक उभारावे, अपूर्ण चन्ना प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, तालुक्यातील १०० टक्के आदिवासी गावे पेसा कायद्यात समाविष्ठ करावे अशा २८ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, जेष्ठ नेते अ‍ॅड. राम मेश्राम, तालुकाध्यक्ष रविंद्र शहा यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.