आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज रहा – जिल्हाधिकारी

0
16

भंडारा,दि.10ः-वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले. जागतिक आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जी.जी. जोशी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
९ ते १३ ऑक्टोंबर हा जागतिक आपत्ती व्यवस्थापन सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जाते. या सप्ताहात नागरिकांमध्ये आपत्ती विषयी जनजागृती करण्याचे काम प्रशासनातर्फे केले जाते. विविध विभागाच्या सहाय्याने व समन्वयाने आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मोठय़ा प्रमाणात करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
निसर्ग निर्मित व मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर असणे गरजेचे आहे. या सप्ताहादरम्यान नागरिकांसाठी प्रत्येक तहसिलस्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहादरम्यान चित्ररथ, कलापथक, जिंगल्स व पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे चित्रकला, वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाभरात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सांगितले. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने काढण्यात येणार्‍या लोकराज्य मासिकाचा ऑक्टोंबर २0१८ चा अंक ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ यावर आधारित आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखविली. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.