माथनी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड

0
17

मौदा(शैलेष रोशनखेडे)दि.10 : पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात एका जुगार अड्ड्यावर छापा मारून आरोपींच्या ताब्यातून १९ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, संदीप भाजनगरे, प्रवीण जावरकर, मुकेश मंजूरकर, रोहित आडे, कोमल कडू व निषाद मेश्राम यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा मारला. यादरम्यान त्यांना ११ आरोपी पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले. आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, तासपत्ते, ११ मोबाइल, चार चारचाकी वाहने असा एकूण १९ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी प्रमोद साहू, अतुल सदवर्ती, धनराज अहुजा, शंकर कोरडे, नितीन इटनकर, नरेश मेंढेकर, नितीन धार्मिक, राहुल भिशीकर, नीलेश पवार, महेंद्र भिशीकर व शुभम खापेकर (सर्व रा. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी केली. .