भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४-जी सेवा सुरू

0
12

भंडारा,दि.11ः-भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी राज्यात सर्वप्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १0 ऑक्टोबरपासून ४-जी सेवा सुरू केल्याची माहिती बीएसएनएलचे व्यवस्थापक अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खा. मधुकर कुकडे व बीएसएनएल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अरविंद पाटील म्हणाले, भारत संचार निगम लिमिटेड संपूर्ण देशात दूरसंचार सेवा प्रदान करणारी भारत सरकारची एकमात्रकंपनी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशाच्या कानाकोपर्‍यात दूरसंचार सेवा पोहचवायची आहे. त्यासाठी ग्रामीण क्षेत्रात बीएसएनएल २ जी नेटवर्क ४ जी नेटवर्क करण्यात आले आहे. बीएसएनएलने महाराष्ट्रात सर्वप्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४ जी नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यात यापूर्वी ३८, ३ जी साईट्स होती. आता ती १५७, ४ जी साईट्स होणार आहे. डाटा कवरेजसुद्धा ४ पट झाले आहे. भंडारा जिल्ह्यात भारत नेटचे संपूर्ण कार्यपूर्णझाले आहे. यात १ हजार ९0 ग्रामपंचायतींना जोडण्यात आले आहे. याशिवाय इंडियन स्विचिंग टेक्नोलॉजीच्या सहाय्याने तुमसर येथे आधुनिक स्विचद्वारा सेवा दिली जात आहे. ही सेवा उर्वरित तालुक्यांमध्ये लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४ जी नेटवर्कसाठी सुमारे ५0 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून पुढील सहा वर्षात त्याची परतफेड होईल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केला. खा. मधुकर कुकडे यांनी बीएसएनएलचे कर्मचारी ग्राहकाभिमुख असले पाहिजे. त्यांनी अधिक चांगल्याप्रकारे ग्राहकांना सेवा दिली पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी बीएसएनएलच्या विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली.