अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी करीता काढली मोटारसायकल रॅली

0
131
गोंदिया,दि.11:- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी अभियानानिमित्त १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी मोटारसायकलने निघालेल्या वर्धा जिल्हा शाखेच्या सहा महिला कार्यकर्त्यांचे गोंदिया जिल्ह्यात उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.या मोटारसायकलस्वार महिलांनी 850 किलोमीटरचे अंतर 7 आक्टोंबरपर्यंत पुर्ण करुन वर्धा जिल्ह्यात  पोचले. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव,गोरेगाव,गोंदिया तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रमासह कलापथकाच्या माध्यमातून फटाक्यातून होणारे प्रदूषणावर माहिती देण्यात आली.या मोटारसायकल रॅलीचे चंद्रपूर,गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर येथे आगमन झाल्यानंतर अर्जुनी मोरगाव येथील बहुउद्देशीय हायस्कूलच्या प्रांगणात मुख्याध्यापिका सुनीता हुमे,अंनिसचे पदाधिकारी माणिक गेडाम,विनोद बन्सोड, डी. टी. कावळे,डॉ.माधवराव कोटांगले व अनिल गोंडाने यांनी स्वागत केले.
मुख्याध्यापिका सौ.हुमे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित कार्यक्रमात डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्धा येथील प्रा.डॉ.माधुरी झाडे,वर्धा जिल्हा शाखेच्या प्रधान सचिव सारिका डेहनकर,कविता राठोड,पंकजा गादेवर,प्रतिभा ठाकूर आणि कविता लोहट यांनी फटाकेमुक्त,प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानाबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.फटाके फोडल्याने ध्वनी प्रदूषण,वायु प्रदूषण होते.त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात.हे टाळण्यासाठी  फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा किंवा कमीत कमी फटाके फोडा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंदिया जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष डी. टी. कावळे यांनी तर संचालन व आभार शिक्षक एम. व्ही.बोकडे यांनी मानले.त्यानंतर गोरेगाव येथील स्व.पी.डी.रहांगडाले हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालयात प्राचार्य एच.डी. कावळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पथनाट्य सादर करून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला.याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद,हौसलाल रहांगडाले,परेश दुरुगवार उपस्थित होते.संचालन व आभार शिक्षक ए.एच.कटरे यांनी मानले.
5 आक्टोंबरला गोंदियाच्या वाजपेयी चौकातून बाईक रॅली शहरात काढण्यात आली.ही रॅली संविधान चौकात येताच नगर सेवक विनीत शहारे यांनी महिला कार्यकर्त्यानी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.तर वॉर्डातील महिलांनी बिस्कुटे व पाण्याच्या बाटल्या सप्रेम भेट देऊन अभिनंदन केले.येथील समूहासह ही रॅली चंद्रशेखर वॉर्डातील गोंदियाच्या माजी नगराध्यक्ष आशाताई पाटील यांच्या निवासस्थानाजवळ येताच त्यांनी व असंख्य महिला-पुरुषांनी रॅलीचे स्वागत केले.या ठिकाणी डॉ.माधुरी झाडे यांनी अभियानाबद्दल माहिती दिली व आपल्या महिला साथींसोबत ‘आम्ही प्रकाश बीजे,रुजवीत आलो,वाटा नव्या युगाच्या,रुळवित चाललो’ हे गीत सादर करून रॅलीत चैतन्य निर्माण केले.  ही रॅली एम.जी.पॅरामेडिकल कॉलेजात येताच  या कॉलेजच्या विश्वस्थ,माजी न.प.सदस्य मनसरबाई गोंडाने आणि संचालक अनिल गोंडाने यांनी स्वागत केले.या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,
प्राध्यापक वृंद यांना मार्गदर्शन करताना सारिका डेहनकर यांनी फटाकेमुक्त दिवाळी अभियानाचा उद्देश,अंधश्रद्धा निर्मूलन,वैज्ञानिक जाणिवा व विवेकशीलता याबद्दल प्रबोधन केले.येथील कार्यक्रमानंतर  मनसारबाई गोंडाने यांनी हिरवी झेंडी दाखवताच ही रॅली जि.प.हायस्कूल एकोडी येथे पोचताच प्राचार्य व शिक्षकवृंदानी स्वागत केले.प्राचार्य एस.ए.कापगते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिला साथींनी प्रदूषणमुक्त/फटाकेमुक्त दिवाळी अभियानावरील  नाट्य सादर करून प्रबोधन केले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक एच.पी.दराडे यांनी केले.येथील आयोजनासाठी उपाध्यक्ष रमाकांत खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणीचे माणिक गेडाम,विनोद बन्सोड, डी. टी.कावळे,डॉ.माधवराव कोटांगले आणि अनिल गोंडाने उपस्थित होते.येथील कार्यक्रमानंतर महिला कार्यकर्त्या तुमसर मार्गे भंडाराकडे रवाना झाल्या.