दारूच्या व्यसनाने व्यक्ती, कुटुंब दुभंगतो!-जि.प.अध्यक्ष भोंगळे

0
51

ब्रम्हपुरी ,दि.12ः- व्यसन कोणत्याही प्रकारचे असो, ते वाईटच असते. दारूचे व्यसन ज्याला लागले, त्याचा जीवन तर उद्ध्वस्त होतेच! पण समाजावरही त्याचे दूरगामी परिणाम होतात.आपल्या जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून अपघात,भांडणे,मारामार्‍यांचे प्रमाण घटले, हे सत्य आहे.ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही, तर संघटनेचीही आहे. पूज्य शेषराव महाराजांच्या या व्यसनमुक्ती संघटनेच्या कार्याचा मी गौरव करतो.’दारू सोडा आणि संसार जोडा’कारण व्यसनामुळे व्यक्ती, समाज दुभंगतो, असे मार्मिक विचार चंद्रपूर जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळेंनी मांडले.
ते ब्रह्मपुरीच्या कुर्झा वॉर्डात प.पूज्य शेषराव महाराज १७ वी पुण्यतिथी तथा व्यसनमुक्ती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. अतुल देशकर होते. तर प्रमुख उपस्थितीत जि.प.उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी पेशने . खानोरकर, अँड. गोविंदराव भेंडारकर,नगरसेविका प्रतिभा फुलझले, डॉ. धनराज खानोरकर, पं.स.उपाध्यक्ष विलास उरकुडे, जिल्हाध्यक्ष अनिल ढोंगळे, कोषाध्यक्ष पंडित काळे, रावजी जिभकाटे उपस्थित होते.याप्रसंगी गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पाडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. देशकर म्हणाले की, व्यसन करायचे असेल तर, चांगल्या कामाचे व्यसन करा. ब्रह्मपुरीत दारूमुळे मी अनेक मित्रांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले आहे. महिलांनी आपल्या घरवाल्याला समज द्यावी, संघटनेतर्फे हे कार्य जोमात व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी गावोगाहून आलेल्या अट्टल सहा दारूड्यांनी दारू सोडल्याचा संकल्प केला. त्यांचा पाहूण्यांच्यावतीने सत्कार केल्या गेला.
प्रास्ताविक संघटनाध्यक्ष अनिल ढोंगळेंनी केले तर संचालन व आभार सुखदेव खेत्रेनी केले.यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक विलास विखार, ब्रह्मपुरी संघटनाध्यक्ष दिवाकर कुझ्रेकर, सुरेश जिभकाटे, रमेश विखार, विलास टीकले, देवानंद बिलवणे, दिनेश कुंडले, गोपाल बावनकुळे, विजय वानस्कार, नंदू वैद्य, नेपाल लाखे, कांचन कुझ्रेकर, संगीता टीकले, पुष्पा जिभकाटे यांनी पर्शिम घेतले.