दोन कोटीतून होणार रस्त्यांची कामे-गटनेता देवेंद्र टेंभरे

0
4

अर्जुनी मोरगाव,दि.12 : कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्थानिक विकास निधीच्या भरवशावर न राहता थेट मंत्रालयातून शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणून आपल्या प्रभागाचा विकास साधने याला जास्त महत्त्व आहे. अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे भाजप नगरसेवक तथा नगरपंचायतीचे गटनेते देवेंद्र टेंभरे यांनी या विभागाचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरविण्यासाठी साहाय्य योजनेंतर्गत पाठपुरावा करून दोन कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव शहरातील प्रभाग १० मध्ये १४ सिमेंट रस्त्यांची कामे होणार आहेत. या निधीला महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव विवेक कुंभारे यांनी ३ ऑक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केली आहे.

अर्जुनी मोरगाव पंचायतचे गटनेते तथा प्रभाग क्र.१० चे नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांनी सध्या शहर विकासाचा ध्यास घेतला असून शहरवासीयांना मूलभूत व भौतिक सुविधा, उत्तम रस्ते प्राप्त व्हावे व शहराचा विकास व्हावा या उदात्त हेतूने प्रभाग क्र.१० चा विकासाचा आराखडा तयार केला. सर्वप्रथम नागरिकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून प्रभागातील १४ रस्त्यांचा आराखडा व प्रस्ताव या विभागाचे विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्याकडे सुपूर्द केला. फुके यांनी सदरच्या अनुषंगाने माझे निर्वाचन क्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायतमधील प्रभाग १० मध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सदर विकासकामाला २ कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशी शिफारश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २४ जुलै रोजी केली. त्यानुसार अर्जुनी मोरगावच्या प्रभाग १० मध्ये प्रत्येक १५ लाख रुपये प्रमाणे १४ सिमेंट रस्त्याचे बांधकामासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार राज्यातील नगरपंचायतींना वर्ष २०१७-१८ करिता नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना ‘नागरी सुविधा पुरविण्यासाठी साहाय्य’ या योजनेअंतर्गत ९५.६८ कोटींचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विशेष अनुदान म्हणून अर्जुनी मोरगाव नगरपंचायतला प्रभाग क्र.१० मधील रस्त्याचे बांधकामाकरिता २ कोटी रुपयांचे निधी मंजूर करण्यात आले आहे. यामुळे अर्जुनी मोरगाव शहरात रस्त्याचा विकास होणार आहे. प्रभाग १० प्रमाणेच अर्जुनी मोरगाव शहरात नागरी सुविधा पुरविण्याचे संदर्भात अजूनही कुठून तरी निधी आणता येईल का? या विषयी विचार विनिमय सुरू असल्याचे नगरपंचायतचे नगरसेवक व गटनेता देवेंद्र टेंभरे यांनी सांगितले. .