कृषिपंपांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर भर-ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार

0
20
  • कुपटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण
  • सोलरफिडरद्वारे कृषिपंपांना दिवसा अखंडित वीज देण्याचा प्रयत्न

वाशिम, दि. १२ :  गेल्या चार वर्षात शासनाने प्रलंबित कृषिपंप वीज जोडण्या देण्याचा वेग वाढविला असून मागेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषिपंपाला वीज जोडणी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कृषिपंपाला सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यावर राज्य व केंद्र शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार यांनी केले. मानोरा तालुक्यातील कुपटा येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड हे होते.

याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, कुपटाच्या सरपंच माया दिघडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, अधीक्षक अभियंता (पायाभूत सुविधा) राहुल बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. येरावार म्हणाले की, जिल्ह्यातील मागेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषिपंपाला वीज जोडणी देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या चार वर्षात वाशिम जिल्ह्यात सुमारे १२ हजार कृषिपंपांना वीज जोडणी दिली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवनज्योती योजना, पायाभूत आरखडा २, पीएसआय, आयपीडीएस योजनेतून जिल्ह्यात ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणी, अतिरिक्त रोहित्र उभारणी, तसेच उपकेंद्र व रोहीत्रांची क्षमता वाढविण्याची कामे सुरु आहेत.

वीज गळतीमुळे वीज वितरण यंत्रणेवरील ताण वाढत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने यावर उपाय म्हणून शासनाने एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र्य रोहित्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात नवीन १ लाख सौरकृषि पंप देण्याच्या निर्णयाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून १५ हजार मेगावॉट वीज निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीतून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून वाशिम जिल्ह्यात दोन ठिकाणी सौर कृषि वाहिन्या प्रस्तावित आहे. पैनगंगा नदीवरील ११ बॅरेज परिसरात वीज वितरणासाठी पायाभूत सुविधा निर्मितीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याचे श्री. येरावार यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक कृषिपंपाला वीज देण्याचा तसेच प्रत्येक घर प्रकाशमान करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर शेतीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची कार्यवाही गतिमान करण्यात आली आहे. या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात सुद्धा चांगले काम झाले असून वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला पुरेसे पाणी आणि वीज उपलब्ध करून देवून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. राठोड यावेळी म्हणाले.

खासदार गवळी म्हणाल्या की, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वीज वितरण यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवनज्योती योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्याला ३३ कोटी रुपये मंजूर झाले होते. यामाध्यमातून उभारण्यात आलेल्या उपकेंद्र व रोहित्र उभारणीमुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. जिल्ह्यात सौभाग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने आतापर्यंत वीज न पोहोचलेली घरेही आता प्रकाशमान झाल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पाटणी म्हणाले, पाणी आणि वीज ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बाब असून या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी कारंजा व मानोरा तालुक्यात एकूण ८ उपकेंद्र मंजूर झाली होती, यापैकी कुपटा उपकेंद्र आज कार्यान्वित होत असून यामुळे परिसरातील १० ते १२ गावांतील कृषिपंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. तसेच या दोन तालुक्यात आतापर्यंत सुमारे ७०० नवीन रोहित्र उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी नवीन १२ उपकेंद्राची उभारणीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना मुख्य अभियंता श्री. केळे म्हणाले, मानोरा येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रातून निघणारी कोंडोली वाहिनी अतिभारीत झाल्याने वीज पुरवठा सुरळीत होऊ शकत नव्हता. आता कुपटा येथे उपकेंद्र सुरु झाल्याने या वाहिनीवरील वीज भार कमी होणार असून या उपकेंद्रातून तीन नवीन ११ के.व्ही. वीज वाहिन्या टाकण्यात आल्याने हट्टी, चोंडी, जनुना, कुपटा, सावरगाव, धानोरा, आसोला धरण, वापटा आदी गावांमधील कृषिपंप व घरगुती अशा एकूण १४५० व कोंडोली वाहिनीवरील १५४० ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करून उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले आभार सहाय्यक अभियंता सतीश केदार यांनी मानले.