राज्यातील २०२ तालुक्यात दुष्काळ जाहीर गोंदिया व भंडारातील 6 तालुक्यांचा समावेश

0
69

गोंदिया,दि.14ः- या खरीप हंगामात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरी ११४२.२ मि.मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ७६.८ इतकी आहे. त्यामुळे सरासरी २३.२ मि.मी. पावसाची तुट निर्माण झाल्याने अनेक तालुक्यांमधील पिके धोक्यात आली आहेत. ज्या २0१ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळाची प्रथम कळ लागू केली आहे त्या तालुक्यांमध्ये मागील २१ दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या तालुक्यांमध्ये तातडीच्या उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जाणार आहेत.राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या प्रथम कळ असलेल्या तालुक्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील देवरी,सालेकसा व अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील पवनी, मोहाडी व लाखनी या तालुक्यांचा समावेश आहे.यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, बल्लारपूर, जिवती, कोरपना  तालुक्याचा समावेश आहे.

गोंदिया,भंडारा जिल्ह्यासह ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व गडचिरोली जिल्ह्याध्मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे. नाशिक, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ५0 ते ७५ टक्के पाऊस कोसळला असून रत्नागिरी व सातारा जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र, २५ ते ५0 टक्केपर्यंत पाऊस झाला आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. सध्या धान फुलोर्‍यावर असून, काही ठिकाणचे धान कापणीवर आले आहे. परंतु, पावसाअभावी पिकांच्या पुढील वाढीवर परिणाम होणार आहे. याशिवाय निळे भुंगेरे, पिवळा खोडकिडा या किडीचा तर करपा व कडाकरपा या रोगांचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. सोयाबीन पिकावर उंट उळी, चक्री भुंगा व खोडमाशी या किडीचा प्रादूर्भाव आढळून आल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यातील सर्वच विभागात यावर्षी किड व रोगांचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. कोकण विभागातील भात पिकावर खोडकिडा, निळे भुंगेरे, नाशिक विभागात ज्वारी पिकावर मावा, खोडकिडा व पाने खाणार्‍या अळीचा, तूर पिकावर रस शोषणार्‍या किडीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणार्‍या अळीचा, कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झालेला आहे. पुणे, कोल्हापूर, लातूर, अमरावती विभागात सारखीच स्थिती निर्माण झालेली असल्याने दुष्काळाचे चटके सोसावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे, गोसेखुर्द सिंचन प्रकल्प हा पवनी तालुक्यातच आहे. त्याच तालुक्यातील शेतकर्‍यांना प्रकल्पाचे पाणी मिळत नाही, हे वास्तव आहे. मग या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेंच प्रकल्पाच्या टेलवर भंडारा व मोहाडी तालुके येतात. कालपर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने झालीत. परंतु, अजुनही भंडारा तालुक्यातील धान पिक पेंचच्या पाण्यापासून वंचित आहे. मोहाडी तालुक्यातील वरठी परिसरातील सुमारे ४ हजार हेक्टर शेती पाण्याच्या प्रतीक्षेत राहिल्याने धान करपले आहेत.
अखेर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील 32 जिल्ह्यातील 201 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषीत केले गेले आहे. ते घोषीत करतांना माहे सप्टेंबर 2018 पर्यंतचा हवाला देण्यात आला. या यादीमध्ये  गडचिरोली जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही.