उपराजधानीत सातवे अ. भा. जलसाहित्य संमेलन

0
14

नागपूर,दि.14 : पाण्यासंदर्भातील प्रश्न साहित्यिकांमार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला पाणी मंच नागपूर आणि आकांक्षा मासिकाच्या सहकार्याने २० आणि २१ आॅक्टोबरला अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती अरुणा सबाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाचे उद्घाटन २० आॅक्टोबरला सकाळी १०.३० वाजता भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते होईल. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, अतुल देऊळगावकर, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. वसंत पुरके यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी नीरक्षीर या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते होईल. दुपारी १ वाजता जल आणि संत साहित्य, ३ वाजता अर्थशास्त्र आणि जलउपलब्धी यावर परिसंवाद, सायंकाळी ५ वाजता अभिजित घोरपडे यांची मुलाखत होईल. २१ आॅक्टोबरला सकाळी ९.३० वाजता अनुभवकथन, ११ वाजता जल आणि लोकसाहित्य, दुपारी १ वाजता कविसंमेलन होईल. ३ वाजता संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती अरुणा सबाने यांनी दिली. पत्रकार परिषदेला अमिताभ पावडे, डॉ. वंदना महात्मे, डॉ. प्रमोद मुनघाटे, समीक्षा शर्मा, वंदना बनकर उपस्थित होत्या.