बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खा. पटेल

0
12

सडक अर्जुनी,दि.15 : केंद्र व राज्य सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरत आहे. सरकाराच्या जनविरोधी धोरणांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. इंधन दरवाढ सातत्याने होत आहे. तरीही सरकार आपल्या स्वभावगुणांचा परिचय देत ५ रुपये दर कमी केले, असे सांगून लॉलीपॉप देत आहे. मात्र, दुसरीकडे इंधन दरवाढीत लगाम खेचण्यात येत नाही. महागाई वाढतच चालली आहे. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांचा विकास खुंटलेला आहे. असे असले तरी यासंदर्भात सत्ताधारी पक्षाचे जनप्रतिनिधी पळवाट काढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्येदेखील सरकाराविरूद्ध रोष खदखदत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपयर्ंत पोहोचून सरकाराचे अपयश लक्षात घेत पक्षाला बळकट करावे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
स्थानिक त्रिवेणी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुथ सदस्य व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी संबोधित करताना ते बोलत होते.
खासदार पटेल पुढे म्हणाले, खोटे बोलणे हे भाजपचे स्वभावगुण आहे. खोटे आश्‍वासन देऊन सत्ता काबीज केली. मात्र, आश्‍वासनांची पूर्तता मुळीच केली नाही, यापासून सर्वसामान्य जनता अवगत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असफल ठरल्या आहेत. या सर्व बाबींचा उहापोह सर्वसामान्य जनतेत झाला पाहिजे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथस्तरावर कामाला लागून जनतेच्या थेट संपर्कात यावे, तसेच पक्षाला बळकट करण्यासाठी कार्य करावे. येत्या निवडणुकीत निश्‍चितच जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी उभी राहणार आहे, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी कोहमाराचे सरपंच वंदना धोटे, शिवाजी गहाणे, डव्वाचे सरपंच पुष्पलता बडोले, सरपंच दिनेश कोरे आदी पदाधिकार्‍यांनीदेखील विचार व्यक्त केले. यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बन्सोड, नरेश माहेश्‍वरी, मनोहरराव चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशिवार, रमेश चुर्‍हे, किशोर तरोणे, मिलन राऊत, सडक अजुर्नीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, छायाताई चव्हाण, जीवन लंजे, रुपविलास कुरसुंगे, नरेश भेंडारकर, सचिन लोहिया, डॉ. कोरे, प्रभुदयाल लोहिया, शिवाजी गहाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, रजनी गिर्‍हेपुंजे, मंजू डोंगरवार, एफआरटी शाह, रिता लांजेवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ. अविनाश काशिवार व आभार प्रदर्शन शाह यांनी केले.