मुख्य बातम्या:

संविधानाला कुणीही हात लावू शकणार नाही : बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.16 : सध्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान बदलणार अशा अफवा पसरविल्या जातात. भारतीय संविधानाने आपल्या देशाला जगात ओळख करून दिली. सर्व समावेशक असलेल्या भारतीय संविधानाला कुणीच हात लावू शकणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. .

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बरडटोली अर्जुनी मोरगाव येथील संविधान चौकात व पिंपळगाव खांबी येथे आयोजित भीमज्योत प्रज्वलीत कार्यक्रमात (दि.१४) बडोले बोलत होते. सर्वप्रथम राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून बुद्धविहारात भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तुळशीकर, सभापती अरविंद शिवणकर, नगराध्यक्ष किशोर शहारे, भारतीय बौद्ध महासभेचे सोनदास गणवीर, डॉ. भारत लाडे, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, नगरसेविका वंदना जांभुळकर, वंदना शहारे, राष्ट्रवादीचे नगर अध्यक्ष मनोहर शहारे, अनिल दहिवले, सुखलाल रामटेके, व्यंकट खोब्रागडे, चंपा वालदे, नाना शहारे, पुनाराम जगझापे, युवराज खोब्रागडे, बादशहा लाडे, दानेश साखरे, जगदीश मेश्राम, डॉ. अजय अंबादे, नगेंद्र खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. .

पुढे बोलताना राजकुमार बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला प्रज्ञाशील करुणेचा धम्म दिला. शोषित पीडितांचा उद्धार करताना डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी मुक्याला बोलके, आंधळ्याला डोळस व बहिऱ्यांना मार्ग दाखविले. डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली नसती तर आजही मागासवर्गीय बहुजन समाजाच्या देहाच्या सालीचे नगारे वाजले असते. अशा जातीय व्यवस्थेतून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढले व दु:खातून मुक्त केले. बुद्धाचा धम्म व संविधानाच्या माध्यमातून समता व समानतेचा व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. सर्व ऐश्वर्य सोडून बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी गृहत्याग केला. बुद्ध धम्म म्हणजे माणुसकीची शिकवण देणारा आहे. हा धम्म आचरणात व कृतीत आणला पाहिजे, बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. प्रत्येकानी श्रामनेर बनून विपश्यना करावी व शांती, समता प्रस्थापित करावी, बुद्धाच्या पंचशील व अष्टांगमार्गाचा अवलंब करा, त्यासाठी धम्म समजणे गरजेचे आहे. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेल्या सर्वस्थळांचा आम्ही विकास केला. राज्यातील शंभर विद्यार्थ्यांना जगातल्या विद्यापीठात उच्च शिक्षणाला पाठविले, एमपीएससी, युपीएससी साठी पाठविले, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वसतिगृहे, निवासी शाळा अनेक ठिकाणी निर्माण केल्या, कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत जमिनीची किंमत तीन लाखावरून ८ लाख केली. असे अनेक समाजाप्रती कामे केली, असे सांगून राजकुमार बडोले म्हणाले, बुद्धविहार हे शिक्षणाचे व चांगल्या विचारांचे माध्यम झाले पाहिजे, आचरण शिकवण व समाज पुढे कसा जाईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे, असे आवाहनही बडोले यांनी केले. प्रास्ताविक व संचालन नगेंद्र खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते. .

Share