सर्पदंशप्रकरणी गोरेगावात पोलिसांच्या विरोधात रास्तारोको,आंदोलनाला हिसंक वळण

0
8

गोरेगाव(गोंदिया) दि.१६ : सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुवैदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष असून पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांना त्वरीत सोडण्यात यावे. या मागणीला घेवून नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. टायरची जाळपोळ केली. त्यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाचा सर्प दंशाने रविवारी (दि.१४) मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन तीन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहचले. मात्र एकदा मृत्यू झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉ.लिल्हारे व दोन जणांना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना घोटी येथे पोहचता आले नाही. पोलिसांनी डॉ.लिल्हारे यांना घोटी येथे पोहचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे गोरेगाव येथे तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखत अतिरिक्त पोलीस ताफा मागविण्यात आला आहे.