जि.प.प्रशासकीय इमारतीच्या मैदानाचे होणारे डांबरीकरण

0
14
गोंदिया,दि.१७- जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत परिसरातील मैदानाच्या डांबरीकरणासह खडीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी ३ लाख रुपयाच्या आतील कामाचे नियोजन विशेषत्वाने एका खास कंत्राटदाराला काम करता यावे यासाठी करण्यात आलेले आहे.एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी हे कुठल्याही कामात गैरव्यवहार होऊ नये शासकीय पैशाची उधळपट्टी होऊ नये यासाठी नियोजन करीत असतानामात्र प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील मैदानाचे खडीकरण व डांबरीकरणाचे कंत्राट मात्र डाबंरीकरणाचा प्लांट नसलेल्या एका कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.विशेष म्हणजे जे काम सद्या सुरु करण्यात आलेले आहे.ते फूलचूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यासबंधी माहिती घेण्यात आली असता जे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले ते काम सप्टेंबर महिन्यातच पुर्ण करावयाचे होते.मात्र सप्टेंबर महिन्यात ते काम सुरु करण्यात आले नाही आणि आता ऑक्टोंबरमध्ये हे काम सुरु करण्यात आले असून त्या कामाला अद्यापही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.त्यातही हे काम हॉटमिक्समध्ये व्हायला हवे कारण या भागात वाहनांची वर्दळ अधिक आहे असे असतानाही हॉटमिक्सला का डावलण्यात आले हा प्रश्नही निर्माण झालेला आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये कामे सुरु असतानाचा शासकीय नियमांना बगल दिली जात असल्याने सीईओ साहेबांच्या पारदर्शक कामकाजाला बांधकाम विभागाचे उपअभियंता कंत्राटदाराला हाताशी धरुन हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.याकडे सीईओ साहेबांनी लक्ष देऊन या कामाच्या चौकशीसोबतच गुणवत्तेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.