महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवा माहितीदूत व्हावे- डॉ. एन.के.बहेकार

0
10

 स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त
 गोंदिया येथे जिल्हा कार्यशाळा
गोंदिया दि.१८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात युवा माहितीदूतास प्रत्येकी ५० कुटूंबांना शासनाच्या योजनांची माहिती दयावयाची आहे. सदर उपक्रम विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणाकडे लक्ष देवून करावयाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाज सेवेची संधीही मिळणार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना अनेक शासकीय योजनांची माहितीही मिळणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन एस.एस. गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी केले.
एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात युवा माहितीदूत उपक्रमाची जिल्हास्तरीय कार्यशाळा राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रासेयो संचालक डॉ. केशव वाळके, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. इंदीरा बुध्दे, डॉ. रेखा लिल्हारे, प्रा. बबन मेश्राम, डॉ. किशोर नागपूरे, रासेयो जिल्हा समन्वयक व मराठी विभाग प्रमुख कविता राजाभोज उपस्थित होते.
पदवीधर झाल्यानंतर जॉब व करिअर यामधील फरक विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, करिअर म्हणजे स्वत: व्यवसाय करुन किंवा मेहनत करुन आत्मनिर्भर होणे व सक्षम होऊन दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे होय. असे जॉब मध्ये नसते यात व्यक्ती सर्वकाळ नौकरच राहतो. स्वत:चा विकास करा व दूसऱ्यांचाही विकास करा, अशी विद्यार्थ्यांशी संवादात्मक चर्चा डॉ. एन.के. बहेकार यांनी केली. या उपक्रमात एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थींनीनी मोठया संख्येने सहभागी व्हावे व हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असे त्यांनी सांगितले.
युवा माहिती दूत उपक्रमात ३० वैयक्तिक लाभाच्या योजना व १० सामूहिक योजना आहेत. त्यांची माहिती लोकांना पटवून दयावयाची आहे. त्यासाठी या योजनांचा अभ्यास माहिती दूतांनी करावा व योजनेची माहिती लोकांना दयावी. अभ्यासाव्यतिकरीक्त वेळेचे व्यवस्थापन करुन हे काम करावे. विद्यार्थी स्वत: युवा माहितीदूत या ॲप्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करु शकतात. युवकांनी लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती घ्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर, व्हिडिओ, एफएक्यु देण्यात आलेला असेल. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्जाचे नमुने संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल माहिती दिलेली असेल. लाभार्थ्यांना हे ॲप्लीकेशन डाऊन लोड करण्यासाठी माहिती दूत प्रेरित करतील.
या ॲप्लीकेशनला शासनाचे इतर ॲप्लीकेशन देखील जोडण्यात आले असल्याने सर्व योजना उपक्रमाची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे. मार्गदर्शक, समन्वयक, माहितीदूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य शासनाकरीता तळागाळाच्या पातळीवर काम करण्याची महत्वाची संधी युवकांना मिळणार आहे. तसेच युवा माहिती दूत अशी ओळख मिळेल व राज्य शासनाच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे डॉ. केशव वाळके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांनी युवा माहितीदूत उपक्रमाचे सादरीकरण केले.
शासनाच्या ५० योजनेचा युवा माहिती दूतातर्फे प्रसार व प्रचार होणार आहे. त्यामुळे तळागाळातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेची माहिती मिळेल. माहिती दूतांनी आपले मित्र, नातेवाईक, परिसरातील आप्त, परिचित यांना शासनाच्या योजनांची माहिती दयावी. तसेच हे काम करतांना विद्यार्थ्यांना योजनेची माहिती होवून जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम होवून स्पर्धा परीक्षेसाठी व करिअर साठी त्याचा उपयोग होईल. या सोबतच लोकराज्य या शासनाच्या मासिकाच्या माध्यमातून विविध योजना जाणून घेवून त्याची सुध्दा लाभार्थ्यांना माहिती दयावी. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. बबन मेश्राम यांनी केले.
प्रास्ताविकात डॉ. कविता राजाभोज यांनी सांगितले की, युनिसेफच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारा युवा माहिती दूत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या उपक्रमात जिल्हयातील प्रत्येक महाविद्यालयात एक मार्गदर्शक नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. माहितीदूतांना काही अडचणी आल्यास त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या मार्गदर्शकाशी संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांनी यात स्वयंप्ररणेने सहभाग घ्यावा. हे काम एैच्छिक आहे. या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना समाज सेवेची संधी मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.यावेळी डॉ. इंदीरा बुध्दे, रेखा लिल्हारे व किशोर नागपूरे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. कविता राजाभोज यांनी केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.