सेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0
16

नागपूर,दि.19 – सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील  सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. या प्रकरणी इमामवाडा पोलिस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर राखुंडे हे १९ ऑगस्ट १९७६ रोजी पीडब्ल्यूडीमध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून नोकरीला लागले होते. तसेच २९ फेब्रुवारी २०१२ मध्ये ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे अनेकांनी त्यांच्या संपत्तीबाबत एसीबीकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी २० टक्‍के संपत्ती त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे तपासांत स्पष्ट झाले. २२ लाख ६९ हजार २४५ रुपये एवढी रक्‍कम त्यांच्याकडे अपसंपदा म्हणून सापडली आहे. राखुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेले पैसे पत्नी अर्चना यांनी लपवून ठेवण्यात मदत केली. तसेच त्या पैशाचा गैरवापर केला. या प्रकरणी अर्चना राखुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील आणि अति. अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या पथकाने केली.