शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरु

0
6

वाशिम, दि. १९ : सन २०१८-१९ पासून राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’ (https://mahadbtmahait.gov.in)  हे एकत्रित संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक व सूचना कार्यक्रम समाज कल्याण विभागाने जाहीर केला आहे.

या कार्यक्रमानुसार २० ऑक्टोंबर रोजी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना जाहीर सूचना देण्यात येतील. १६ ऑक्टोंबरपासून माहितीपत्रक, हस्तपत्रिका, भिंतीपत्रक तयार करून विद्यार्थी व पालकांना वाटप करण्यात येईल. २१ ते २८ ऑक्टोंबर दरम्यान महाडीबीटी पोर्टलची जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर मेळावे आयोजित करून अर्ज भरण्याबाबत माहिती दिली जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ५ नोव्हेंबरपर्यंत खाजगी, शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील ११ वी व १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरता येतील. तसेच १५ नोव्हेंबरपर्यंत १० वी व १२ वी नंतरच्या ब्यावासायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरता येणार आहेत. या कालावधीत नोंद झालेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी वेळोवेळी तपासून व मान्य करून ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालये यांनी विहित कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.