लाच स्वीकारताना काेरंभीटाेलाचा ग्रामसेवक एसीबिच्या जाळ्यात

0
13

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.२० : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथे ग्रामसेवकाने आयोजित विशेष ग्रामसभेत सरकारमान्य विदेशी दारू दुकानाचा ठरावात उल्लेख न केल्याचा मोबदला म्हणून १ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारताना आरोपी ग्रामसेवक पंजाब लोभा चौहान (३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.२०) कोरंभीटोला येथे करण्यात आली.
कोरंभीटोला येथे तक्रारदाराची सरकारमान्य विदेशी दारू दुकान आहे. देशी दारू दुकान व गावअंतर्गत दारू दुकान बंद करण्याबाबत कोरंभीटोला ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. दरम्यान, तक्रारदार व ग्रामसेवकामध्ये वाटाघाटी सुरू झाली. शेवटी ग्रामसेवकाने १ लाख रुपये दिल्यास आपल्या दुकानाचे नाव विशेष ग्रामसभेच्या ठरावात येऊ देणार नाही, अशी हमी दिली. मात्र, पैसे देऊन काम करण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १९ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे कबुल झाले. त्या अनुषंगाने आज (ता.२०) कोरंभीटोला येथे सापडा रचण्यात आला. दरम्यान, आरोपी ग्रामसेवक पंजाब चौहान याने पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपी ग्रामसेवक चौहान यांच्याविरूद्ध अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात, पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पो.हवा. प्रदिप तुळसकर, पो.हवा. राजेश शेंद्रे, नापोशि रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, चालक नापोशि देवानंद मारबते यांनी केली.