शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली धान पिकांची पाहणी

0
8
 डिटेल सर्व्हे करण्याच्या सूचना
 प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला लाभ मिळावा
नितीन लिल्हारे
मोहाडी ,दि.20- जिल्ह्यातील काही कृषी मंडळात कमी पाऊस झाल्याने पाण्याअभावी धान पिकांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकांची पाहणी केली. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा डिटेल सर्व्ह करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी कृषी विभागाला दिल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार सूर्यकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
   मोहाडी तालुक्यातील पांजरा, मोहगाव देवी व आंधळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्री यांनी धान पिकांची पाहणी केली. मायाबाई मरघळे व गोपीचंद जगनाडे पांजरा, मधुसुदन साठवणे, वामन साठवणे व रामू चकोले मोहगाव देवी आणि कृष्णा चव्हाण, इशान बुऱ्हाडे, प्रशांत उपरकर, हेंमत मारवाडे, विनोद नवघरे, आंधळगाव, शेखर साखरवाडे मोहगाव, या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्र्यांनी धान पिकांची पाहणी केली.
 जिल्हयात कमी पावसामुळे ऐन कापणीच्या वेळी धानाला पाणी मिळाले नाही व शेकडो हेक्टर जमिनीवर धानाचे पीक अक्षरश: वाळल्यासारखे दिसत होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पीक पिवळे झालेले दिसत होते. हाती येत असलेल्या पिकाला ऐनवेळी पाणी मिळू न शकल्यामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी हा दौरा करुन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.
 पेंच जलाशयातील पाण्याची पातळीही अत्यंत कमी झाली आहे. केवळ 28 टक्केच पाणीसाठी धरणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या शेताजवळून पेंच धरणाचा नहर गेला आहे. पण पाणी नसल्यामुळे शेतकरी आपल्या पिकाला पाणी देऊ शकले नाही. ज्या शेतकऱ्याकडे  विहिरी आहेत त्यांनी आपल्या पिकाला पाणी देऊन पीक वाचवले पण  मोठया प्रमाणातील शेतकरी मात्र पिकात पाणी देऊ शकले नाही. अशा शेतकऱ्यांवर मात्र नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाडच कोसळली आहे. या सर्व बाबीची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
Attachments area