मुख्य बातम्या:

शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत ‘जवाब मांगो आंदोलन’

गोंदिया ,दि.२१: अखिल भारतीय शेतकरी, शेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात २३ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवर ‘जवाब मांगो आंदोलन’ करण्यात येणार असून यात देशातील लाखो शेतकरी शेतमजुरांकडून एकत्रित होऊन संसदेचा घेराव करण्यात येणार आहे. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातूनही पाच हजारांवर शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून मागील साडे चार वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून देऊन जवाब मागण्यात येणार आहे. आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत. अशी माहिती शेतकरी शेतमजूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार रामरतन राऊत यांनी २0 ऑक्टोबर रोजी शासकीय विर्शाम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासह देवरी तालुका किसान संघटनेचे अध्यक्ष धनपत भोयर, तालुका सचिव कैलास घासले आदी उपस्थित होते. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मोदी सरकारला काही प्रश्नांचे उत्तर मागणार आहोत. यात त्यांनी शेतकर्‍यांच्या बाबतीत स्वामीनाथन समितीची रिपोर्ट लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले ? शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे आश्‍वासनाचे काय झाले ? पंतप्रधान पीक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना का मिळत नाही? शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचे काय झाले ? शेती उत्पादनाच्या खर्चाच्या दीडपट हमीभावाचे घोषणा केली मात्र बरोबर का लागू झाली नाही? धानाला प्रति क्विंटल तीन हजाराच्या भावाचे काय झाले ? दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे काय झाले ? प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना शासकीय नोकरीच्या आश्‍वासनाची पूर्तता केव्हा होणार ? काळा पैसा व पंधरा लाख रुपयाच्या अश्‍वासनाचे काय झाले ? आदी अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात येणार आहे. या आंदोलनात जवळपास तीन लाख शेतकरी एकत्रित येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातही शेतकर्‍यांची स्थिती फार गंभीर असून शासनाने दिलेल्या आश्‍वासनाची अद्याप पूर्तता केली नसून शेतकर्‍यांना नुकसानीचा, दुष्काळाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. कर्ज माफीच्या प्रकरणांमध्येही शेतकर्‍यांना फार समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Share