आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत – सर्पदंश प्रकरण

0
5

गोंदिया,दि.21ः- गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सर्पदंश झालेल्या आदित्य गौतम या बालकाच्या मृत्यू प्रकरणी गोरेगावात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईने आता घोटी गावात दहशत निर्माण झाल्याचे चित्र असून याप्रकरणाला 21 ऑक्टोबला सहा दिवासाचा कालावधी झालेला आहे.त्यातच सर्वत्र नवरात्रोत्सव व विजयादशमीचा जल्लोष साजरा होत असताना घोटी गावात मात्र, स्मशान शांतता पसरल्याचे चित्र बघावयास मिळाले.
गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे आदित्य गौतम या बालकाला १४ ऑक्टोबर रोजी सर्पदंश झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्याचे अंत्यसंस्कार करतेवेळी बालाघाट कटंगी येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी त्याचेवर उपचार करून बरे करण्याचा दावा केला होता. मात्र, डॉक्टर उपचारासाठी आले असता गोरेगाव पोलिसांनी त्याच रात्री त्यांना व त्यांच्या दोन सहकाèयांना मृतकाचे नातेवाईक रमेश खेमलाल कटरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून अटक केली होती. मात्र पोलिसांनी डॉक्टरांना उपचार करण्यास अटकाव केल्याचा आरोप करत गावकèयांनी डॉक्टर व त्यांच्या सहकाèयांना सोडण्याच्या मागणीला घेवून १६ ऑक्टोबर रोजी गोरेगावात मुख्यरस्त्यावर रस्तारोको आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करत टायरची जाळपोळ करून एसटी बसच्या काचा फोडल्या तर पोलिसांवर दगडफेक करून राग व्यक्त केले होते. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आंदोलनात सहभागी २२ जणांनी २०० ते २५० ंआंदोलकांना घेवून गोरेगाव येथील दुर्गा चौकात पोलिस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करून वाहतूक अडवून, एसटी बसच्या काचा फोडून पोलिसांवर दगडफेक केल्यावरून व जिल्हधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असून सुध्दा आंदोलन करून एसटी बस जाळण्याचा व बसमधील प्रवाश्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करून पोलिसांना शासकीस कामात अटकाव केल्याने सरकारतर्फे फिर्यादी पोलिस हवालदार भोयर यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असता गावात शंका-कुशंकाना ऊत आला असून अनेक चर्चांना पेव फुटले आहे. तर पोलिस कारवाईची दहशत नागरिकांमध्ये दिसून येत आहे.