मुख्य बातम्या:

टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले

अर्जुनी मोरगाव, दि.२१: साधारणत: सप्टेंबर महिन्यात धान फुलोऱ्यावर येतो. परंतू अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात २५ टक्केच पाऊस झाल्यामुळे व २२ दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळे तालुक्यात टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे होणाऱ्या टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
पंचायत समिती सभागृह अर्जुनी/मोरगाव येथे २० ऑक्टोंबर रोजी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, तहसिलदार धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, माजी आमदार हेमंत पटले, जि.प.सदस्य रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे उपस्थित होते.
श्री.बडोले पुढे म्हणाले, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या टंचाई सदृष्य परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतऱ्यांच्या शेतपिकाचे योग्य पध्दतीने सर्वेक्षण करुन हा अहवाल शासनास पाठवून शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर योग्य तो मोबदला देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मावा तुडतुड्याचे पैसे बँकेने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. वन हक्क जमीनीचे पट्टे प्रकरणे निकाली काढण्यात यावे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. विद्युत विभागाने ४५० कनेक्शन लवकरात लवकर देण्यात यावे. ज्या गावात सिंचनाची सोय नाही त्या गावात प्रशासनाने लक्ष्य देवून सिंचनाची सोय उपलब्ध करुन दयावी. पांदन रस्त्याची कामे मार्गी लावण्यात यावे. तहसिलदारांनी तुडतुड्याचा गावनिहाय आढावा घ्यावा व बँकेच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्यावे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एकूण २४ विधुर/विधवा लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Share