१५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर,गोंदिया-भंडारा जिल्ह्यांना वगळले

0
12

गोंदिया,दि.0१ः-राज्यातील २६ जिल्ह्य़ांमधील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर ११२ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आणि राज्याच्या ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे दुष्काळसदृश्य स्थितीमध्ये गोंदिया,भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होता.परंतु मुख्यमंत्र्यांनी जेव्हा दृष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केली त्यामधून या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांना वगळण्यात आल्याने गोंदिया,भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती नसल्यावर प्रशासन व शासनाने शिक्कामोर्तंब केले आहे. विदर्भातील गंभीर दुष्काळी तालु्क्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी ,बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व नागपूर जिल्ह्यातील  काटोल व कळमेश्‍वर तालुक्यांचा समावेश आहे.
दुष्काळ घोषित केल्याचे आदेश बुधवार ऑक्टोबर ३१ पासून अंमलात आणले जातील. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपयर्ंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येईल त्या तालुक्यांतील महसूल वसुली, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.दुष्काळ जाहीर केल्यानंतर देण्यात येणार्‍या सवलतीसंदर्भात लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.दरम्यान, सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. पावसाळा संपत आला तरी राज्यातील अनेक तालुके अक्षरश: कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार आहे.विशेष म्हणजे यंदा प्रथमच गोंदिया जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळी घट झाल्याने पुढील तीन चार महिने कठीण असल्याचे सांगितले. मागीलवर्षी सुद्धा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे.