जिल्ह्यात १२९१ शेततळ्यांची निर्मिती; शेततळ्यांमुळे मिळाली सिंचनाची हमी उत्पादनात आली शाश्वतता

0
16

वाशिम, दि. ०2 : जिल्ह्यात वनांचे कमी असलेले क्षेत्र आणि सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे जिल्ह्यात पाऊस देखील कमी पडतो. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना देखील बसतो. जिल्ह्यातील बहुतांशी शेती ही कोरडवाहू असल्यामुळे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून करावी लागते. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होतो.

शेतीच्या उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि दुष्काळावर मात करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासोबतच शेती काही कालावधीसाठी संरक्षित सिंचनाखाली आणून अधिक उत्पन्न घेण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. खरीप हंगामात पावसाच्या खंड कालावधीत शेततळ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला असून त्यामुळे पिकांच्या उत्पादनात शाश्वतता येण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यातील सहाही तालुक्यात शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालवधीत कृषि विभागाने १२९१ शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी तयार केली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे तयार केले आणी त्या शेततळ्यातील पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी पिकांच्या उत्पादनासाठी केला. त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात देखील वाढ झाली आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मंगरूळपीर तालुक्यात मिळाला. या तालुक्यात ३६० शेततळी तयार करण्यात आली आहेत. वाशिम तालुका १२५, रिसोड तालुका १४८, मालेगाव तालुका १६१, मानोरा तालुका २५८ आणि कारंजा तालुक्यात २३९ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी तयार केली. ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेतला. त्या शेतकऱ्यांना शेततळ्यातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करता आला. त्यामुळे काही कालावधीसाठी शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करता आली. शेततळ्यामुळे शेतकरी देखील जलसाक्षर होवून पाण्याचा वापर काटकसरीने पिकांसाठी करू लागला आहे. ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.