हिवरा रोहिला येथील गट्टा नाला खोलीकरण शेतकऱ्यांसाठी ठरले उपयुक्त

0
27
  • भूजल पुनर्भरणामुळे जलस्त्रोतांना मुबलक पाणी
  • रब्बी पिकांचे उत्पादनही वाढले

 यशोगाथा

दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु करण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले आहे. या अभियानातून झालेल्या कामांमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली असून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे…

वाशिमपासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर असलेले हिवरा रोहीला हे गांव. इथल्या बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती. जिल्ह्याचे पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. हिवरा शेतशिवाराच्या हद्दीतून जाणाऱ्या गट्टा नाल्यावर २० वर्षापूर्वी काही अंतरावर ४ सिमेंट नाला बंधारे बांधले. परंतू हे बंधारे गाळाने भरल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला येणाऱ्या येणाऱ्या पुरामुळे नाल्याच्या काठावर दोन्ही बाजूला असलेल्या शेतात नाल्याचे पाणी साचत होते. त्यामुळे शेतातील पिके सडू लागली. काही शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याच्या काठावर बांधलेल्या विहिरीमध्ये सुध्दा गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली. दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासनाचे महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान गट्टा नाल्याच्या  काठावरील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले.

सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने जलयुक्त शिवार अभियानातून गटृटा नाल्याचे खोलीकरण केले. या खोलीकरणामुळे अनेक वर्षापासून नाल्यात साचलेला गाळ उपसण्यात आला. त्यामुळे नाला खोल झाला आणि सिमेंट बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात नाल्यात होऊ लागली. मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात साठविल्या गेल्याने भूगर्भात पाण्याची पातळी वाढवण्यास मदत झाली. त्यामुळे नाल्याच्या काठावर शेतकऱ्यांनी बांधलेल्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. एवढच नव्हे तर शेतकरी विहिरीचे पाणी पुढील पिकाच्या सिंचनासाठी राखून ठेवू लागले आहेत. आधी नाल्यात असलेल्या पाण्याचा वापर तुषार सिंचनाद्वारे पिकासाठी करीत आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरणाचे काम होण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातच विहिरीतील पाण्याने तळ गाठलेला असायचा. आता मात्र जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत विहिरीला पाणी राहणार असल्यामुळे रब्बी हंगामात पिके घेण्याची सुविधा निर्माण झाली आहे. या सुविधेमुळे पिकांची उत्पादकता तर वाढणार आहेच सोबत अधिक उत्पन्न सुध्दा मिळणार आहे.

हिवरा येथील शेतकरी कैलास कव्हर म्हणाले, माझी सात एकर शेती या गट्टा नाल्याच्या काठावर आहे. जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरणाचे काम होण्यापूर्वी नाला गाळाने भरला असायचा. पाणी वाहून शेतात यायचे. त्यामुळे शेतात पाणी साचल्यामुळे पिके सडून जायची. अल्प उत्पन्न हाती यायचे. विहिरीला तेंव्हा पाणी कमी असायचे. सन २०१६-१७ मध्ये नाला खोलीकरणाचे काम झाले आणि इथले चित्र पुर्णपणे बदलून गेले. २० वर्षापूर्वी नाल्यावर बांधलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली. भूगर्भात पाण्याची साठवणूक देखील मोठ्या प्रमाणात होवू लागली. विहिरीतील पाण्याची पातळी देखील वाढली आहे. पूर्वी शेतात ४ ते ५ क्विंटल तूर व्हायची. मागील वर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुले १८ ते २० क्विंटल तूर झाली. सोयाबीनला देखील पाणी देता आल्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले.

नाल्यातील पाणी आणि विहिरीतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे मागील वर्षीपासून रब्बी हंगामात गहू, हरभरा घेता येणे शक्य झाले. यावर्षी साडेपाच एकर शेतीला सिंचनाची सुविधा जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झाली गहू अडीच एकर असून १५ क्विंटल गव्हाचे उत्पन्न आणि ३ एकरमधून १० क्विंटल तूरीचे उत्पन्न अपेक्षीत असल्याचे श्री. कव्हर यांनी सांगीतले. आधी दिवाळी झाली की पिण्याच्या पाण्याची समस्या असायची आता मात्र पिण्यासाठी, पिकांसाठी आणि पाळीव जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध असल्याचे श्री. कव्हर म्हणाले.विलास कव्हर यांची ८ एकर शेती नाल्याला लागून आहे. नाल्याच्या काठावर विहीर असून विहिरीतील पाण्याची पातळी वरच आहे. खरीप हंगामात सोयाबीनला व तूरीला आवश्यकता असतांना पाणी दिले. रब्बी हंगामात मागील वर्षी तूरीला पाणी दिल्याने चांगले उत्पन्न मिळाले. ३ एकर हरभरा लावला असता १२ क्विंटल तर तूर १५ क्विंटल झाल्याचे त्यांनी सांगीतले.

जयवंत पैठणकर हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्याकडे २ एकर शेती. तूर, सोयाबीन ही कोरडवाहू पिके नाला खोलीकरणापूर्वी घ्यायचे. मात्र त्यांना अल्प उत्पन्न मिळायचे. पाण्याचे महत्त्व त्यांना चांगलेच पटल्यामुळे त्यांनी सन २०१४-१५ मध्ये शेताला लागून असलेल्या नाल्यातील गाळ स्वत: उपसला. स्वत: मेहनत घेवून नाल्याच्या काठावर १६ फुट खोल विहीर सुध्दा खोदली आणि कॉक्रींटने बांधली सुध्दा. पूर्वी त्यांना २ क्विंटल तूर व्हायची मागील वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने १३ क्विंटल सोयाबीन २ क्विंटल उडीद १ क्विंटल मुग देखील झाले. जलयुक्तमुळे हे चित्र पालटल्याचे पैठणकर यांनी सांगीतले. विहिरीला उपलब्ध पाणी असल्यामुळे यावर्षी अर्धा एकर गहू पेरला असून चांगले उत्पन्न होईल. अर्धा एकर हरभरा सुध्दा पेरला असून ५ क्विंटल तर एक एकर तूरीतून ४ क्विंटल तुरीचे उत्पन्न अपेक्षीत असल्याचे सांगीतले.

एजाज पठाण यांच्या १५ एकर शेतीला नाला खोलीकरणाचा चांगला फायदा झाला आहे. शेतातील नाल्याच्या काठावर असलेली विहिर पाण्याने तुडूंब भरलेली आहे. सोयाबीन, तर, हरभरा हे पिके ते घेतात. त्यांनी यावर्षी ५ क्विंटल सोयाबीन घेतले. ३५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न अपेक्षीत आहे.अशोक सरकटे म्हणाले, माझी ६  एकर शेती नाल्याला लागून आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे नाल्याचे खोलीकरण झाले. आमच्या १५ शेतकऱ्यांच्या शेतीचे चित्र नाला खोलीकरणामुळेच बदलले. तुषार सिंचन पध्दतीने पिकांना पाणी देण्यात येते. यावर्षी ५ क्विंटल तूर आणि ५ क्विंटल हरभराचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले.

गट्टा नाल्याचे खोलीकरण करण्यात आल्यामुळे जवळपास १ किलोमीटर नाल्यातील ४ सिमेंट नाला बंधारामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे या नाल्याच्या दोन्ही काठावर असलेल्या जवळपास 15 शेतकऱ्यांची 70 एकर शेती सिंचनाखाली आली. आता हे शेतकरी रब्बी हंगामात पाण्याचा काटकसरीने वापर करुन स्प्रिंक्लर (तुषार) आणि ठिंबक सिंचन पध्दतीतून तूर, हरभरा आणि गहू पिके घेवू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबत उत्पन्न वाढीसाठी देखील जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरले आहे

हिवरा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष ग्रामस्थांना जाणवू नये आणि जलस्त्रोतांना पाण्याच्या पुनर्भरणामुळे पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून कृषि विभागाने ढाळीचे बांध बांधले, सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरणाची कामे केलीत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने नाल्याच्या खोलीकरणाची कामे आणि भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेनी रिचार्ज शाफ्ट, गॅबीयन बंधारा, भूमीगत बंधारा व पुनर्भरण चर तयार करण्याची कामे केलीत. यातून ३५३ टीसीएम पाण्याची साठवणूक झाली. जलयुक्त शिवार अभियानातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती संरक्षित सिंचनाखाली आल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून उत्पन्नात वाढ झाली आहे. भूगर्भात पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक झाल्यामुळे जलस्त्रोतांना देखील मुबलक पाणी असल्यामुळे टंचाईवर मात करता येणे जलयुक्त शिवार अभियानामुळे शक्य झाले आहे.