महात्मा बसवेश्वर स्मारकाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा-अर्थमंत्री मुनगंटीवार

0
22

मुंबई दि. २ : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे करावयाच्या जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक आणि कृषी पर्यटन केंद्राचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांनी लवकर सादर करावा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.सह्याद्री अथितीगृहात यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शासकीय विभागांचे अधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या स्मारकाच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, फेब्रुवारी २०१९ च्या सुरुवातीला या स्मारकाचे भूमिपूजन करता येईल यादृष्टीने कामाला वेग द्यावा. स्मारकाला निधीची कमतरता पडणार नाही, यासाठी आवश्यकता पडल्यास आकस्मिकता निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते म्हणाले.स्मारकाचे काम करताना वास्तुविशारदांनी हे काम पर्यावरणस्नेही होईल याची काळजी घ्यावी. येथे सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक कसा करता येईल, याचाही विचार करावा, रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

स्मारकासाठी कृषी विभागाची २६ हेक्टरची जागा उपलब्ध असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, ती जागा महात्मा बसवेश्वरांच्या स्मारक तसेच कृषी पर्यटन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यास कृषी विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. १२ व्या शतकात जगातील पहिली संसद महात्मा बसवेश्वर यांनी आयोजित केल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली.
स्मारकाचा आणि कृषी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये अनुभव व ध्यान मंडप, स्वागत कमान, महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा, पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे, वाहनतळ, यात्री निवास, प्रशासकीय इमारत, कुटिर व्यवसाय केंद्र, सभागृह, वातानुकुलीकरण, प्ले झोन, बहुउद्देशीय हॉल, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व ग्रंथालय, संरक्षण भिंत, मत्स्य शेती, चिंच उद्यान, भाजी-फूल-फळांसाठी ग्रीन हाऊस, खिलार गायींचा गोठा अशा विविध कामांचा समावेश होता. हे स्मारक विश्वाच्या आनंदाचे आणि शांतीचे केंद्र व्हावे, भाविक आणि पर्यटक येथून आनंदी होऊन परतावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.