गटविकास अधिकाऱ्यांनी केली ‘डीएसी’ गहाळ

0
5

गोरेगाव,दि.04 : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या( मनरेगा) कुशल कामगारांच्या मजुरीची रक्कम येऊनही दिवाळी मात्र या मजुरांची अंधारात जाण्याची वेळ आली आहे.या मजुरांच्या मजुरीची रक्कम खात्यावर वळते करण्यासाठी लागत असलेले डिजिटल हस्ताक्षर प्रमाणपत्र(डीएसी) येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रोहिणी बांधकर यांनी हरविल्याने कामाची रक्कम अडल्याचा प्रकार समोर आला आहे.जिल्हा परिषदेत मग्रारोहयो विभागाचे काम बघणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिल्हारे यांनी याबाबत कबुली दिली आहे.
तालुक्यात मनरेगाची कुशल कामे सन २०१७-१८ या वर्षात एक कोटी १३लाख ९६ हजार रुपये व सन १८-१९ या वर्षात दोन कोटी ५९ लाख ७७ हजार रुपयांची करण्यात आली आहे़त. या रक्कमेची मागणी शासनाकडून गटविकास अधिकारी यांनी करावयास पाहिजे होती मात्र या अधिका-यांनी स्वत:चे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र गहाळ केल्याने त्या रक्कमेची मागणी पंचायत समिती प्रशासनास आतापर्यंत करता आली नाही.मनरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम,गोठा बांधकाम ,सिंचन विहीर बांधकाम, शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या मनरेगा रक्कमेतुन गोरेगाव पंचायत समितीला कामाचे अनुदान निधी चाळीस लाख २३ हजार मंजूर झाले आहे, मात्र गटविकास अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम मिळू शकली नाही.