विशेष वृत्त जलयुक्त शिवार अभियानातून 9523 कामे पुर्ण 67 हजार 362 पाणीसाठा निर्माण

0
113

1 लक्ष 10 हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण

वाशिम, दि. ०: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतीतील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनाचे महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयासाठी देखील उपयुक्त ठरले आहे. मागील चार वर्षाच्या कालावधीत जिल्हयातील 469 गावांमध्ये या अभियानांतर्गत विविध यंत्रणेमार्फत 9249 कामे पुर्ण करण्यात आली. यामधून 67 हजार 362 दशलक्ष घनमिटर (टिसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून यामधून 1 लक्ष 10हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या या किमयेमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता आली असून शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पिकांचे उत्पन्न घेत आहे. या अभियानामुळे शेतकरी रब्बी हंगामात देखील हरबरा, गहू, मका व भाजीपाला वर्गीय पिके घेत आहे. जलयुक्त शिवार अभियानापुर्वी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा शेतकरी आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामातील पिके घेण्यासोबतच उन्हाळी पिके घेण्याच्या तयारीत आहे.सन 2015-16 या वर्षात जिल्हयातील 200 गावांची निवड या अभियानाच्या पहिल्या वर्षी करण्यात आली. या गावातील शेत शिवारात 22 हजार 608 हेक्टरवर 5057 कामे पुर्ण करण्यात आली. यामधून 34 हजार 417 दशलक्ष घनमीटर (टिसीएम) पाणीसाठी निर्माण झाला. या पाण्यातून 68 हजार 834 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.सन 2016-17 या वर्षात 149 गावांची निवड करण्यात आली या गावाच्या शेत शिवारात 8343 हेक्टरवर 2069 कामे पुर्ण करण्यात आली. यामधून 22 हजार 786 दशलक्ष घनमिटर (टिसीएम) पाणीसाठा निर्माण झाला या पाण्यातून 33 हजार 178 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.

सन 2017-18 या वर्षात 120 गावात 2123 कामे 8796 हेक्टरवर करण्यात आली यामधून 10 हजार 159 दशलक्ष घनमिटर (टिसीएम) पाणीसाठा निर्माण झाला.  यामधून 8540  संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली.सन 2018-19 मध्ये जिल्हयातील 252 गावांची निवड करण्यात आली. यामध्ये 3124 कामे प्रस्तावीत करण्यात आली असून त्यापैकी  274  कामे 133 हेक्टरवर पुर्ण करण्यात आली आहे. सन 2015-16 ते 2017-18 या तीन वर्षाच्या कालावधीत 469 गावांमध्ये 9523 कामे पुर्ण करण्यात आली आहे.  त्यानुसार  67  हजार  362 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला असून यामधून 1 लक्ष 10 हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानातून सलग समतल चर, मातीनाला बांध, गॅबीयन बंधारे, खोल सलग समतल चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर, माती नालाबांध दूरुस्ती,शेततळे, ढाळीचे बांध, नाला खोलीकरण व सरळीकरण, साखळी सिमेंट बंधारे, सिंमेट बंधारा दूरुस्ती, पाझर तलाव दूरुस्ती, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दूरुस्ती, पुनर्भरण चर,रिचार्ज शॉफ्ट, लोकसहभागातून गाळ काढणे, वृक्ष लागवड, रोपवाटीका, भूमिगत बंधारे, ठिबक सिंचन, खोल खंदक आदी कामे करण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढली असून उत्पन्न देखील वाढण्यास मदत झाली आहे.जलयुक्तच्या या कामामुळे भूजलपातळी मोठया प्रमाणात वाढ झाली असून पुर्वी ऑक्टोबरमध्ये तळ गाठणाऱ्या विहिरी आता मार्चपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सहायभूत ठरणार आहे. अनेक जलस्त्रोतांना सुध्दा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास सुध्दा मदत झाली आहे.