आदर्श साखरा झाले पाणीदार; अडीच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण

0
31
  • जलयुक्त शिवारमुळे 250 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण
  • जलस्त्रोतांना मुबलक पाणी, 35 टिसीएम पाणीसाठा निर्माण
  • सिंचनासाठी तुषार व ठिबक पध्दतीचा वापर

वाशिम, दि. ०: वाशिमपासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेले साखरा हे आदर्श गांव.राज्य   शासनाच्या आदर्श गांव योजनेत साखरा गावाची निवड झाली. गावाच्या विकासात गावातील प्रत्येक कुटूंबाने योगदान देण्याचा निश्चय केला आणि योगदानातून गावाचा चेहरामोहराच बदलला. गावात आदर्श गांव योजनेच्या नशाबंदी, कुव्हाडबंदी, नसबंदी, श्रमदान, बोअरवेल बंदी, लोटा बंदी आणि पाण्याचा ताळेबंद या सप्तसुत्रीत आणखी शिक्षण या विषयाचा समावेश करुन त्याची अमलबजावणी सुरु केली आहे. ग्रामस्थांच्या लोकसहभाग आणि श्रमाच्या किमयेतून गावाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानीत करण्यात आले आहे. सन 2015-16 या वर्षात राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त्‍ शिवार अभियानात पहिल्याच वर्षी या गावाची निवड करण्यात आली.

साखरा हे 189 उंबरठयाची वस्ती असलेले 1100 लोकसंख्येचे गांव. गावातील 150 पेक्षा अधिक कुटूंबाचा व्यवसाय हा शेती आहे. साखरा गावात सन 2011 पूर्वी दुष्काळाची स्थिती होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागायची. ग्रामस्थांना पाण्याचे महत्व कळाले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवून त्याचा उपयोग करण्याचे ठरले. अख्ख गावच जलसाक्षर झाले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणारे साखरा आज पाणीदार झालयं ते ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे. दुष्काळ परिस्थितीच्या काळात पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारे बहुतेक सर्वच शेतकरी सोयाबीन, उडीद, मुग आणि तूर पिक घ्यायचे. पावसाच्या पाण्यावर पिकाचे उत्पन्न तसे कमीच मिळायचं. ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्शगांव योजनेतून काही जलसंधारणाची कामे व इतर कामे करण्यात आली. जमीनीवर खोल समपातळी चर तयार केले त्यामुळे मोठया प्रमाणात भूगर्भात पाण्याची साठवणूक होवू लागली.

साखरा ग्रामस्थांचा लोकसहभाग बघता आणि ग्रामस्थांच्या विकासासाठी राज्य शासनाची महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात सन 2015-16 या पहिल्या वर्षातच जिल्हा प्रशासनाने साखरा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात केली. या अभियानातून जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने जवळपास अडिच किलोमीट नाल्याचे खोलीकरण केले. जवळपास 3 मीटर खोल आणि 8 मीटर रुंद असा अडिच किलोमीटर पर्यंत हा नाला खोल केला. अडिच किलोमीटर दरम्यान 22 स्ट्रक्चर तयार केलेत. याच नाल्यावर 4 सिमेंट नाला बंधारे बांधले जिल्हा भूजल सव्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातून 4 गॅबीयन बंधारे, 4 रिचार्ज शाफ्ट व एक भूमीगत बंधाऱ्याची निर्मिती केली.

            पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साखरा शिवारात अडवून तो भूगर्भात जिरविण्यात आला. नाला खोलीकरणामुळे मोठया प्रमाणात नाल्यात पाण्याची साठवणूक तर झालीच सोबत हे पाणी भूगर्भात साठल्यामुळे नाल्याच्या काठावर व आजूबाजूला असलेल्या 65 विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या नाल्याच्या काठावर दोन्ही बाजूला असलेली जवळपास 250 हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली आहे. पूर्वी केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात पिक घेणारे इथले शेतकरी आता पाण्याच्या मुबलकतेमुळे रब्बी हंगामात देखील तूर, हरबरा, गहू तसेच भाजीपाला वर्गीय भेंडी, पालक, दोडकी, लसन, कांदा, मेथी, कोबी, सांभार हे पिके मोठया प्रमाणात घेत आहे. पिकांना पाटाने पाणी देवून पाण्याची नासाडी न करता तुषार व ठिबक सिंचन पध्दतीने पिकांना पाणी देत आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे नाल्याचे खोलीकरण करण्यात आल्याने मोठया प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाल्याने साखराच्या शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता तर वाढलीच. त्यामुळे त्यांच हाती उत्पन्नातून येणारा पैसा देखील वाढला. पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आली आहे त्यांची सामाजिक व आर्थिक सुधारणास मदत झाली आहे.

9 एकर शेतीचे मालक असलेले विठ्ठल इंगळे म्हणाले, माझ्या एकूण 9 एकर शेतीला जलयुक्त शिवार अभियानाचा फायदा झाला आहे. पूर्वी केवळ कोरडवाहू सोयाबीन घ्यायचो. त्यातून केवळ 3 क्विंटल एकरी उत्पन्न आता हे उत्पन्न एकरी 10 क्विंटल मिळत आहे. आता पाणी असल्यामुळे तूरीला तर पाणी देतोच सोबत गहू व हरबरा देखील पेरल्यामुळे मागील वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. यावर्षी देखील चांगले उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  प्रभू राऊत हे अल्पभूधारक शेतकरी त्यांच्याकडे 1 एकर शेती. शेतातील विहिरीला 2011 पुर्वी पाणीच नसायचे जलयुक्त शिवार अभियानातून नाला खोलीकरण झाल्यामुळे शेतातील विहिरीला आता भरपूर पाणी आहे. पुर्वी केवळ सोयाबीन व हरबरा ते घेत. आता रब्बी हंगामात ते भाजीपाला व गहू घेत आहेत. 10 गुंटे शेतीत त्यांनी फुलकोबी लावली असून त्यामधून त्यांना 30 हजाराचे उत्पन्न अपेक्षीत आहे. भेंडी आणि कारलेमधून त्यांना 40 हजाराचे उत्पन्न मिळाले.

नारायण ठाकरे यांच्याकडे 8 एकर शेती असून शेतीत विहिर व बोर आहेत. पुर्वी ते तूर आणि सोयाबीन घ्यायचे आता ते हरबरा, गहू व इतर भाजीपाला केवळ पाण्याच्या उपलब्धतेमुळे घेत आहे. पुर्वी डिसेंबरमध्ये विहिरी कोरडया व्हायच्या. आता त्यांना एप्रिलपर्यंत रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी सुध्दा पाणी उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.रामचंद्र इंगळे यांच्याकडे 6 एकर शेती. या शेतीत ते पूर्वी सोयाबीन व तूर आणि थोडया प्रमाणात हरबरा घ्यायचे. जलयुक्त शिवार अभियानामधून विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे ते आता तुषार सिंचन पध्दतीतून गहू, हरबरा घेत आहेत. त्यामुळे एकरी उत्पन्न तर वाढलेच रब्बी हंगामात पाणी उपलब्ध झाल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्याचे त्यांनी सांगीतले.

जलदूत सुखदेव इंगळे यांनी सांगीतले की, पुर्वी गावात दुष्काळी परिस्थिती होती शेतकऱ्याच्या शेतातून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. आदर्श गाव योजनेत गाव आल्यामुळे अनेक कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे लोकांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे झालीत. सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात आमच्या गावाची निवड झाल्याने गावाच्या पुर्वेकडे असलेला उत्तर ते दक्षिण वाहणारा अडीच किलोमीटरचा नाला या अभियानातून खोलीकरण केल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याची साठवणूक नाल्यात व भूगर्भात झाल्यामुळे जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. रब्बी हंगामात देखील आता शेतकरी मोठया प्रमाणात उत्पन्न घेत असून उन्हाळी पिके घेण्यास सुध्दा मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे शेतीला संरक्षीत सिंचनाची व्यवस्था तर झाली आहे. तसेच दुष्काळी स्थितीवर मात सुध्दा करता आली आहे.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी कृषि विभागाने विविध योजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना दिला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे, फळबाग लागवड करण्यात आली आहे. तसेच काही शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचनासाठी साहित्य देखील देण्यात आले आहे. नाल्यावर सिमेंट नाला बंधारा बांधल्यामुळे पाण्याची अडवणूक व साठवणूक करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असल्याचे तालूका कृषि अधिकारी देवगिरीकर यांनी सांगीतले.