पोलिस निरीक्षक छत्रपती चिडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
17

चंद्रपूर,दि.08: दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून तीन फेैरी झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
मौशी रस्त्याने पवनी – तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पी एस आय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे  यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान मौशीजवळील गोसे खूर्द नहराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. पोलीस गाडीतून खाली उतरले व दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीकडे पायी चालू लागले . तेवढयात दारूची वाहतूक करणारी गाडी रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घालण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस भांबावले. मात्र तिघे चपळाईने बाजूला झाले. पण प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांचे अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.