नागपुरात इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन २२ पासून

0
12

नागपूर,दि.09 : मागील काही दिवसात नागपुरात अनेक आयकॉनिक गोष्टी घडत आहेत. यातच आता इंडियन रोड कॉग्रेसच्या (आयआरसी) राष्ट्रीय अधिवेशनाचाही समावेश होत आहे. येत्या २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान हे अधिवेशन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशभरातील तज्ज्ञ हजेरी लावणार असून इंजिनियरिंग क्षेत्रात झालेल्या नवनवीन संशोधनाचे पेपर यात सादर केले जातील. यासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे प्रदर्शनही राहणार असल्याने इंजिनियरिंग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाचा खजिना उपलब्ध होणार असल्याने केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.पत्रपरिषदेला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
आयोजन समितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, इंडियन रोड काँग्रेस ही रस्ते विकास आणि संधोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित अशी राष्ट्रीय संघटना आहे. त्यांचेद्वारे दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येते. विविध राज्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग या परिषदेचे आयोजन करीत असतात. रस्ते आणि त्यासंबंधातील वैज्ञानिक अभ्यास व संशोधन या परिषदेत सादर करण्यात येतात. या सर्व अभ्यासावरून आरआरसी-कोड म्हणजे भारताच्या रस्ते निर्मिती संबंधातील मापदंड ठरविण्यात येतात.
२२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे होणाऱ्या या वार्षिक परिषदेमध्ये चार दिवसात तब्बल १० ते १२ तांत्रिक विषयांवरील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. २२ नोव्हेंबरला अधिवेशनाच्या तांत्रिक सत्राचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी विविध सत्रांमध्ये या कार्यशाळांमध्ये आयआयटी सारख्या संस्थांमधील विद्यार्थी आपली शोधपत्रे सादर करतील; त्याचप्रमाणे रस्ते विकास क्षेत्रातील वैज्ञानिकही तसेच बांधकाम उद्योजक तांत्रिक शोधपत्रांचे सादरीकरण करतील.
२३ नोव्हेंबरला अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. देशभरातील विविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री या परिषदेला उपस्थित राहणार असून केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे  यावेळी मार्गदर्शन करतील. २४ नोव्हेंबरला ही विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून २५ नोव्हेंबरला अधिवेशनाचा समारोप होईल.