स्वतःची चिता रचून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, उमरी तालुक्यातील घटना

0
16

नांदेड दि.११ःः- स्वत: च सरण रचत एका शेतकऱ्याने पेटत्या चितेत उड़ी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करूनही अद्याप प्रत्यक्ष शेतकऱयांना मदतीची काहीच घोषणा केली नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चालल्याचे या घटनेमुळे दिसून येत आहे.

पोत्तना बोलपीलवाड (वय ६०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळग्रस्त तालुका असलेल्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील ही घटना आहे. पोतन्ना हे वृद्ध शेतकरी यंदा पडलेल्या दुष्काळामुळे हैराण झाले होता. नापिकी झाल्याने बैंकेचे लाखो रूपयाचे कर्ज कसे फेडावे याची ही त्यांना विवंचना होती. त्यातच दिवाळी सण साजरा करता न आल्याल्याने शेतक-याने आपल जीवन संपवले.
पोत्तना बोलपीलवाड यांनी काल रात्री स्वतः च्या शेतात एकटे असताना आपल सरण रचले आणि स्वतः चितेत उड़ी मारून आत्महत्या केली. वारकरी संप्रदायातील असलेले पोतन्ना देवभक्त आणि शेतीवर निष्ठा असलेले शेतकरी होते. कोरडवाहू जमीन कसत ते आपली उपजीविका कशी-बशी भागवत असत. त्यातच शेतीसाठी त्यांनी घेतलेले कर्ज सरकारच्या कर्ज माफीच्या नियमात बसले नाही. यामुळे त्यांचे कर्ज माफ झालेच नाही. त्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोतन्ना यांच्या आत्महत्येनंतर प्रशासन ख़ड़बडून जागे झाले असून तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देत पुर्ण माहिती घेतली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर टिका केली आहे. सरकार दुष्काळातही शेतकऱयांची चेष्टा करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. सरकारवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करायला हवेत असेही ते म्हणाले.