जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपूरात 4 ते 5 जानेवारीला

0
52

नागपूर ,दि.११:: जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ११ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन – ‘शोध मराठी मनाचाङ्कचे आयोजन यंदा नागपूरला करण्याचे निश्चित झाले आहे. येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ मध्ये हे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे ११ ते १३ जानेवारीदरम्यान साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार असल्याने विदर्भाच्या वाट्याला साहित्यिक मेजवानी आल्याचा आनंद आहे.
१९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाल्यानंतर २००४ साली पहिले जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरातच घेतले होते. या संमेलनाचे अध्यक्ष राम शेवाळकर हे होते. तब्बल १४ वर्षानंतर हा मान पुन्हा नागपूरला मिळाला आहे. शशिकांत चौधरी हे संमेलनाचे समन्वयक असून संयोजक गिरीश गांधी आहेत. स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, उद्योजक सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती व पी. डी. पाटील हे या मार्गदर्शक राहणार आहेत.
देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर शहर वेगाने विकसित होत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रातही शहर झपाट्याने पुढे येत असून, खासदार सांस्कृतिक महोत्सव, डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोह, कालिदास संगीत महोत्सव अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होत आहे. यात जागतिक दर्जाच्या कलावंतांनीही हजेरी लावली आहे. मेट्रो सिटी व स्मार्ट सिटी म्हणून उद््यास येणाऱ्या संत्रानगरीत जागतिक संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व सांस्कृतिक महत्त्व मिळत आहे. जागतिक मराठी अकादमीद्वारे आतापर्यंत १० साहित्य संमेलने घेण्यात आलेली आहेत. दुसरे संमेलन अहमदनगर व यानंतर मुंबई, पुणे, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, विरार (ठाणे) व नाशिक येथे ही संमेलने झाली. अकादमीची संमेलने भारतातच भरवली जातात. पण, त्यात सहभागी होणारे प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.