सुजलाम सुफलाम वाशिम अभियानाचा शुभारंभ

0
23

वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार !

  • राज्य शासन व भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
  • जिल्ह्यात आजपासून जलसंधारणाच्या कामांना सुरुवात
  • शेतकरी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

वाशिम, दि. १३ :  राज्य शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ उपक्रमात वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम वाशिम अभियान’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. याकरिता बीजेएसच्या माध्यमातून जेसीबी व पोकलँड मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत, तर राज्य शासन डीझेल उपलब्ध करून देणार आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला. यावेळी जून २०१९ पर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, सह समन्वयक निलेश सोमाणी, हुकुमचंद बागरेचा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रदीप जैन, संजय आधारवाडे, जुगलकिशोर कोठारी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार श्री. पाटणी यावेळी म्हणाले, भारतीय जैन संघटना व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा पाणीदार करण्याची सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झाली आहे. या अभियानात प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी तसेच प्रत्येक शेतकरी व नागरिकाने सक्रीय सहभाग घेवून हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व शासकीय यंत्रणांनी या अभियानात झोकून देवून काम करावे. तसेच यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेट देवून या कामात सहभागी व्हावे.

सुजलाम सुफलाम वाशिम अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात कमी खर्चात अधिकाधिक कामे करता येणे शक्य आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपले गाव, आपला जिल्हा पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. पाटणी यांनी केले. तसेच प्रशासनाने बीजेएसकडून मिळणाऱ्या सर्व जेसीबी मशीनचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.

आमदार श्री. झनक म्हणाले, सुजलाम सुफलाम वाशिम अभियानामुळे जिल्ह्याला खूप चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा करून घेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. या अभियानाला लोकचळवळ बनवून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, राज्य शासन व बीजेएसने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक संपूर्ण नियोजन केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुध्दा पूर्ण झाली आहे. या अभियानातून जिल्ह्यात अधिक दर्जेदार व मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात येत्या काही दिवसात कामांची संख्या वाढवून अधिक मशीनची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. ठाकरे यांनी सुजलाम सुफलाम वाशिम अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना जिल्हा परिषदेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.

भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष श्री. जैन म्हणाले, बीजेएसच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत. मात्र गतवर्षीपासून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मशिनच्या सहाय्याने जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात १३४ मशीनच्या सहाय्याने ही कामे झाली. यावर्षी वाशिमसह राज्यातील चार जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यात या अभियानातून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी बीजेएस आणि प्रशासन प्रयत्न करीत आहे. लोकांनी सुध्दा यामध्ये सहभागी होवून आपल्या गावामध्ये ही कामे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या अभियानासाठी मागणीनुसार जेसीबी व पोकलँड मशीन बीजेएस उपलब्ध करून देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. आधारवाडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या जेसीबी मशीनचे पूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व मशीनद्वारे बुधवारपासून जलसंधारणाच्या कामांना सुरुवात होणार आहे.प्रास्ताविक शिखरचंद बागरेचा यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती दिली. सूत्रसंचालन निलेश सोमाणी यांनी केले, तर आभार विशाल नागनाथवार यांनी मानले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.