तिमेझरीत तीन एकरातील धान जळून खाक

0
16

गोरेगाव,दि.14 : तालुक्यातील तिमेझरी येथे अज्ञात आरोपींनी धानाचे दोन पुंजणे जाळल्याची घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत दोन शेतकरी कुटुंबीयांचे तीन एकरातील धान जळून खाक झाले आहे. त्यामुळे देवाजी मेश्राम, दिनेश बोरकर या दोन कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या घटनेची माहिती तहसीदार व गोरेगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.देवाजी मेश्राम यांच्या मालकीची अडीच एकर तर दिनेश बोरकर हा अल्पभूधारक असून अर्धा एकर शेती आहे. देवाजी मेश्राम या शेतकऱ्याने भारी प्रजातीच्या धानाची लागवड केली होती. त्याचप्रमाणे दिनेश बोरकर यांनीसुद्धा याच धानाची लागवड केली होती. धानाचे उत्पादन चांगले आले होते. .

धान कापून दोन्ही शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात धानाचे पुंजने रचून ठेवले होते. अज्ञात आरोपींनी संधी साधून रात्रीच्या अंधारात दोन्ही पुंजण्यांना आग लावली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु संपूर्ण धान जळून खाक झाले होते.या घटनेत देवाजी मेश्राम व दिनेश मेश्राम यांना अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रारी पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी आनंद पटले यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे..