संगणीकरण धान्य वितरण प्रणालीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल-अनिल सवई

0
19

गोंदिया, दि.१४:सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यापासून रेशन दुकानांमधील धान्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. पूर्वी शासनाकडून जितके धान्य मिळायचे ते सर्व वितरित झाले असे दाखविले जात होते. परंतु आता ते शक्य नाही. लाभार्थ्यांनी नेमके किती धान्य उचलले याचा सर्व डाटा असतो. त्यामुळे धान्याची बचत होत आहे.त्यातच संगणीकरण पाॅश मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात सलग पाचव्या महिन्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.सोबतच केसरीधारक कार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ठ करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती दिली.जिल्ह्यात 998 स्वस्त धान्य दुकानदारांना पाॅशचे वितरण करण्यात आलेले आहे.यापैकी 77 गावात इंटरनेटची अडचण असून सर्वाधिक गावे यात सालेकसा तालुक्यातील आहेत.गेल्या जून महिन्यापासून सलग जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून आक्टोंबर महिन्यात 92 टक्के पाॅश मशीनच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती सवई यांनी दिली.नक्षलग्रस्त व आदिवासी असलेल्या शेवटच्या टोकावर असलेल्या या जिल्ह्ायत हे काम स्वस्त धान्य दुकानादारांच्या सहकार्यामुळेच होऊ शकल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनातर्फे सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण केले जात आहे. याअंतर्गत अनेक गोष्टी केल्या जात आहेत. जसे रेशन कार्ड आधारसोबत लिंक करणे, लाभार्थ्यांचे डिजिटायझेशन, प्रत्येक रेशन दुकानामध्ये पॉज (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि हरियाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात पुरवठा विभागामध्ये एईपीडीए (आधार एनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) ही धान्य वितरणाची नवीन पद्धत एप्रिल २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या पद्धतीमुळे १०० टक्के धान्याचे वितरण हे आधार व्हेरिफाईड करून दिल्या जात आहे. ई-पॉस या मशीनद्वारे गेल्या 5 महिन्यात वितरणाची सरासरी सतत वाढत चालली असून सप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात ती 92 टक्के राहिली आहे.
गोंदिया जिल्ह्यात 77 हजार 181 अंतोदयचे शिधापत्रिकाधारक अाहेत.तर 6 लाख 4 हजार 6 प्राधान्य गटातील कुटुंबाची लोकसंख्या आहे.केसरी कार्डधारकांची संख्या 90 हजाराच्या जवळ असून यांना मात्र शासनाकडून काहीही मिळत नाही.अंतोदयकार्डधारकाकरीता 33 हजार 200 क्विंटल व प्राधान्य गटातील कार्डधारकांकरीता 27 हजार 100 क्विंटल धान्याचे मासिक मागणी असते.यावेळी दिवाळीनिमित्त अंतोदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना साखरसेह तुळदाळ,चनादाळ व उडददाळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यासोबतच जिल्ह्यात केरोसीनचे 5 डीलर,18 सबडिलर,11129 रिेटेलर व 106 हाॅकरांची संख्या आहे.जिल्ह्यात 1 लाख 96 हजार 593 गॅसधारकांची संख्या असून त्यात 73 हजार 92 उज्वला गॅसयोजनेचे लाभार्थी असल्याची माहिती सवई यांनी दिली.
सलग सहा महिने धान्याची उचल न करणाऱ्या कार्डधारकास नोटीस बजावण्यात येईल. त्यांना धान्याची उचल का केली नाही? अशी विचारणा केली जाईल. ज्यांना गरज आहे ते कार्यालयाशी संपर्क साधतील. जे येणार नाही त्यांना धान्याची गरज नाही असा त्याचा अर्थ काढून त्यांना धान्य लाभार्थीमधून वगळले जाईल. त्यांचे रेशन कार्ड मात्र कायम राहील, अशी माहिती सवई यांनी दिली.