माओवाद्यांच्या प्रमुख पदावरुन गणपती हटले,वसवराजू नवे प्रमुख

0
10
फाईल फोटो

रायपूर(वृत्तसंस्था)दि.29ः-  हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) केंद्रीय नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने राजीनामा दिला आहे. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे गणपतीने पदत्याग केल्याचे सांगितले जाते.
‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघटनेचे महासचिव गण्पती यांनी स्वत:हून पदत्याग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आणि वसवराजू यांची नवे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली,’ अशी माहिती संघटनेचा प्रवक्ता अभय याने एका दोन पानी पत्रकाद्वारे दिली आहे.
सुमारे ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून माओवादी चळवळीत सहभागी असलेला गणपती एका शाळेत शिक्षक होता. शिक्षकी पेशा सोडल्यानंतर तो माओवादी चळवळीत अधिक सक्रिय झाला. १९९२ साली त्याची आंध्र प्रदेशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (मार्क्सवादी-लेनिनवादी) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००४ साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (मार्क्सवादी-लेनिनवादी) आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन गटांच्या विलीनीकरणानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (माओवादी) स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गणपती हा संघटनेचा महासचिव म्हणून कार्यरत होता.
वसवराजू हा गेल्या ३५ वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असून बॉम्ब आणि स्फोटकतज्ज्ञ म्हणून त्याला ओळखले जाते. माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा प्रमुख म्हणून वसवराजूकडे अनेक वर्षे जबाबदारी होती. अनेक हिंसक माओवादी कारवायांची योजना आणि त्यांची अंमलबजावणीमागे वसवराजूचा हात असल्याचे सू्त्रांचे म्हणणे आहे. ‘पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी’च्या नावाखाली वसवराजू कारवायांचे संचालन करीत असे. वसवराजूला बढती मिळाल्यामुळे माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तविली आहे. ‘ सहा महिन्यांपासून वसवराजू हाच माओवाद्यांचा प्रमुख म्हणून काम पाहतो आहे. आता त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. वसवराजूने अनेक वर्षे सशस्त्र कारवायांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे आगामी काळात माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये वाढ होऊ शकते,’ अशी माहिती बस्तरमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.