“दुचाकी वाहन चालकांना आज 1 डिसेंबर पासून हेल्मेट अनिवार्य”

0
23

भंडारा दि.01 :- वाहतुक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व रस्ते अपघात कमी व्हावेत, या अनुषंगाने भंडाऱ्यात आज 1 डिसेंबर 2018 पासून सर्वच दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट वापरणे अनिवार्य असणार आहे. शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी व अभ्यांगतांना 1 डिसेंबर पासून नो हेल्मेट नो एंट्री हा नियम असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पोलीस अधिक्षक कार्यालयात नो हेल्मेट नो एंट्रीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालय रस्ते सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कार्यकारी अभियंता डी.एन. नंदनवार, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, वाहतुक पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडे, हायवे वाहतुक पोलीस निरिक्षक राजा पवार व नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यावेळी उपस्थित होते.
देशात व राज्यात होणाऱ्या रस्ते अपघाताची सर्वोच्च न्यायालायाने गंभीर दखल घेतली असून रस्ते अपघातात 10 टक्के घट करण्याचे उद्दिष्ट सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्याला दिले आहे. या अनुषंगाने रस्ते सुरक्षा समितीने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहिम 1 डिसेंबर पासून पोलीस विभाग राबविणार आहे.
शासकीय कार्यालयातील दुचाकी वापरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. हेल्मेट नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विभाग प्रमुखांना आजच पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिल्या. चार चाकी वाहनचालवितांना सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मद्यपान करुन वाहन न चालविणे व वाहनचालवितांना मोबाईलवर बोलू नये या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकाचा वाहन परवाना निलंबित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहने जात असून याला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने स्पिडगनद्वारे वाहनांची वेग मर्यादा तपासण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे फलक तात्काळ लावावेत. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी वाहतूक पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पाहणी करुन तात्काळ अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवणस्थळाबाबत काय कार्यवाही केली याबाबतचा छायाचित्रासह अहवाल संबंधित यंत्रणेने तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हयात एकूण 18 अपघात प्रवणस्थळ ( ब्लॅक स्पॉट ) आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठकीत दिली. रस्त्यावरील अतिक्रमाणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिकेवर नाराजी व्यक्त केली. नगर पालिकेने शहरात रोड सेफ्टी ऑडिट करावे. तसेच अतिक्रमण विरोधी मोहिम राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
राष्ट्रीय महामार्गावर शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी स्पिड ब्रेकर बसविण्यात यावेत. त्याचप्रमाणे हायवेला येवून मिळणाऱ्या शहरातील एप्रोज रोडवर सुध्दा स्पिड ब्रेकर बसविण्यात यावेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पिडब्रेकरच्या आवश्यकतेबाबत पाहणी करुन अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे, वाहन चालवितांना मोबाईलवर न बोलणे व मद्यपान करुन वाहन न चालविणे हे नियम पाळणे सक्तीचे असून वाहतुक पोलीसांनी 1 डिसेंबर पासून या नियमाच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त मोहिम राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या.