पालकमंत्र्यांच्या हस्ते गंगेझरी व भिवखिडकी मामा तलावाचे विशेष दुरुस्ती कामाचे भूमीपूजन

0
20

गोंदिया दि.३: अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गंगेझरी व भिवखिडकी माजी मालगुजारी तलावाचे विशेष दुरुस्ती कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, पंचायत समिती सदस्य नाजुका कुंभरे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव शहारे, उपविभागीय अभियंता एस.एस.बनसोडे, पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष नुपराज गहाणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, गोंदिया पाटबंधारे विभागाअंतर्गत नवेगावबांध येथे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. या उपविभागाअंतर्गत १ मध्यम प्रकल्प, ५ लघु प्रकल्प व २६ माजी मालगुजारी तलाव असे एकूण ३२ तलावांची देखभाल व दुरुस्तीची कामे येतात. या ३२ तलावांचा शेतीयोग्य क्षेत्र १४४४४.०० हेक्टर असून सद्यस्थितीत सर्व तलावापासून जवळपास ७८४०.०० हेक्टर क्षेत्रास सिंचन होत आहे. एकूण ३२ तलावापैकी १५ तलाव अर्जुनी/मोरगाव तालुक्याअंतर्गत येत असून १७ तलाव सडक/अर्जुनी तालुक्यामध्ये येतात.
गंगेझरी तलावाचे पाणलोट क्षेत्र १७.१०७ चौ.कि.मी. असून उपयुक्त साठा १.३० द.ल.घ.मी. व सिंचन क्षमता ३४०.०० हेक्टर इतकी आहे. या तलावाला दोन मुख्य विमोचक असून कालव्याची एकूण लांबी १०.०० कि.मी. आहे. गंगेझरी माजी मालगुजारी तलावाची धरण व कालवा प्रणाली अत्यंत जुनी असून बांधकाम जीर्ण झालेले आहे. योग्यप्रकारे सिंचन करणे कठीण होत असल्यामुळे या कालव्याचे पुनर्च्छेदन, कुलाबे, नालाक्रॉसींग, कालवा क्रॉसींग, जलसेतू, अस्तरीकरण, धरणाचे अस्मपटल, गावरस्ता पुल, पाणीमोजमाप यंत्र बसविणे, पाणी वापर संस्था स्थापन करणे इत्यादी कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून लवकरच या तलावाचे काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
भिवखिडकी तलावाचे बुडीत क्षेत्र ३९.२९ हेक्टर असून उपयुक्त साठा ०.३१० द.ल.घ.मी. व सिंचन क्षमता १२६ हेक्टर इतकी आहे. या तलावाला दोन मुख्य विमोचक असून कालव्याची एकूण लांबी ४.३५ कि.मी. आहे. भिवखिडकी माजी मालगुजारी तलावाची धरण व प्रणाली अत्यंत जुनी असून बांधकाम जीर्ण झालेले आहे. योग्यप्रकारे सिंचन करणे कठीण होत असल्यामुळे या कालव्याचे पुनर्च्छेदन, मुख्य विमोचकाचे बांधकाम, अस्तरीकरण, गावरस्ता पूल, पाणी मोजमाप यंत्र बसविणे, पाणी वापर संस्था स्थापन करणे इत्यादी कामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून लवकरच या तलावाचे काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून नवेगावबांध पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता एस.एस.बनसोडे म्हणाले, एकूण २६ माजी मालगुजारी तलावापैकी २ तलावांची कामे (कोसबी व चिरचाळी) सन २०१५-१६ मध्ये पूर्ण करण्यात आले असून त्यावर पाणीवापर संस्था स्थापन झालेली आहे. ५ तलावांच्या भाग-१ ची कामे पूर्ण होण्याच्या स्थितीत असून त्यावर पाणीवापर संस्था स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे. ८ तलावांच्या कामांचे कार्यारंभ आदेश प्राप्‍त झाले असून सदर कामे लवकरच सुरु करण्यात येत आहे. ११ तलावांची कामे वरिष्ठ कार्यालयाकडे मंजूरीकरीता पाठविण्यात आलेली आहेत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सिरेगावबांधचे सरपंच हेमकृष्ण संग्रामे, उपसरपंच हिरालाल मेश्राम, सिरेगाव/टोलाचे सरपंच जितेंद्र मेश्राम, उपसरपंच भाऊराव कुंभरे, केवलराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, लोकपाल गहाणे, नामदेव गहाणे, सिरेगावबांध पोलीस पाटील सुरेश गहाणे, तसेच भिवखिडकीच्या सरपंच कविता गेडाम, प्रमोद लांजेवार, भिवखिडकी पोलीस पाटील मोसमी बोरकर उपस्थित होते.