नक्षल नेता ‘गणपती’चे भारतातून फिलिपाईन्सला पलायन!

0
15

गोंदिया,दि.4: नक्षलचळवळीशी संबधित असलेल्या  भाकपा(माओवादी)चे महासचिवपद सोडल्यानंतर नक्षल नेता गणपतीने पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन भारतातून पलायन करीत फिलिपाईन्सला रवाना झाल्याचे वृत्त आहे.य़ा वृत्ताला आंध्रप्रदेशातील गुप्तहेर यंत्रणा दुजोरा देत असल्याचेही समोर आल्याने महाराष्ट्रासह केंद्रीय गुप्तचर संस्थाना मोठा धक्का बसला आहे.छत्तीसगडमधील रायपूरहून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या हिंदी दैनिकाने ३० नोव्हेंबरच्या अंकात आंध्रप्रदेशच्या गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत सदर वृत्त प्रकाशित केले आहे.

ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडे भाकप(माओवादी)च्या महासचिवपदाची सूत्रे होती. मात्र, यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाकप(माओवादी)च्या केंद्रीय समितीच्या पाचव्या बैठकीत नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू याच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.सलग २५ वर्षे महासचिवपदाची, तर १८ वर्षे पॉलिट ब्युरो सदस्यपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या गणपतीचा सध्याचा फोटो पोलिस वा गुप्तचर यंत्रणांना मिळू शकला नाही. सध्या जो फोटो वापरण्यात येतो; तो २५ वर्षे जुना आहे. गणपतीच्या जागेवर गगन्नाची नियुक्ती केल्यानंतर नक्षल चळवळीवर वॉच ठेवून असणाऱ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे या यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन दोन महिन्यांपूर्वीच गणपतीने भारतातून पलायन केल्याची बातमी येत आहे. गणपती हा मूत्रपिंड व यकृताच्या आजाराने त्रस्त असून, उपचारासाठीच त्याने देश सोडल्याचे सांगण्यात येत आहे. गणपतीचे वास्तव्य मुख्यत्वे अबुझमाडच्या जंगलात असायचे. फारच कमी वेळा तो अन्य सुरक्षित ठिकाणी जायचा. तेव्हाही अबुझमाड वा अन्य ठिकाणच्या घनदाट जंगलात बाहेरच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आहेत. परंतु प्रकृती ढासळत चालल्याने औषधोपचारासाठी त्याने फिलिपाईन्सला जाणे पसंत केल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळमार्गे गेला फिलिपाईन्सला…

आंध्रप्रदेशच्या गुप्तचर यंत्रणा गणपतीच्या पलायनाच्या बातमीला दुजोरा देत आहेत. गणपती हा अबुझमाडच्या जंगलातून नेपाळमार्गे फिलिपाईन्सला गेल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे. झारखंड-बिहारमार्गे त्याला सुरक्षितरित्या नेपाळला पोहचविण्यात आले. तेथे फिलिपाईन्सवरुन आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि नंतर तो फिलिपाईन्सला रवाना झाला. फिलिपाईन्सला जाऊन आता दोन महिने उलटले आहेत. खरे तर महासचिवपदाचा नेतृत्व बदल वर्षभरापूर्वीच करण्यात आला. परंतु गणपतीने देश सोडल्यानंतरच त्याची घोषणा करण्यात आली, असे वृत्त छत्तीसगडमधील रायपूरहून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या हिंदी दैनिकाने ३० नोव्हेंबरच्या अंकात आंध्रप्रदेशच्या गुप्तचर यंत्रणांचा हवाला देऊन प्रकाशित केले आहे.

कोण आहे गणपती..

सध्याच्या तेलंगणा राज्यातील करिमनगर जिल्ह्यातील सारंगपूर येथील रहिवासी असलेला गणपती हा विज्ञान विषयातील पदवीधारक व बीएड आहे. सुरुवातीला त्याने करिमनगर जिल्ह्यात शिक्षकाची नोकरी केली. परंतु नंतर तो वारंगळ येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेला. तेथे नल्ला आदी रेड्डी व कोंडापल्ली सीतारामय्या यांच्या संपर्कात आल्यानंतर गणपती नक्षल चळवळीत सहभागी झाला होता.