आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक

0
11

चंद्रपूर,दि.0 ४ : राज्याचे वित्त, नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते  सन २०१८ मध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झालेल्या सावली तालुक्यातील व्याहाड (बु.) येथील ग्रामविकास अधिकारी संदीप सब्बनवारला चार हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार हा व्याहाड (बु.) येथील कंत्राटदार आहे. व्याहाड बुज येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम जनसुविधा योजना वर्ष २०१७-१८ अंतर्गत ई टेंडरिंग नुसार सदर काम अंकुश वरगंटीवार यांना मिळाले असून त्यांनी या कामाचे सर्व अधिकार तक्रारदार यांना दिले होते. ग्रामपंचायत भवन कामाचे स्लॅब लेवलवर आले असून या बांधकामाची पाहणी करण्याकरिता ग्रामविकास अधिकारी आले असता त्यांनी तक्रारदाराला म्हणाले की “तुमचे जे बिल काढून दिले आहे त्याचा मोबदला म्हणून ४ हजार रुपये द्या अन्यथा पुढील बांधकामाचे बिल काढून देण्यास अडथळा निर्माण करतो” सदर रक्कम ग्रामविकास अधिकाऱ्याला देण्यास इच्छुक नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे आज दिनांक ०४ डिसेंबर रोजी व्याहाड (बु.) येथील ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे चेक काढून दिल्याचा मोबदला म्हणुन तडजोडी अंती ३५०० रुपये स्वीकारतांना संदीप सब्बनवारला रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कार्यवाही चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे, महेश मांढरे, सुभाष गोहोकार, अजय बागेसर, रवी धेंगळे, राहुल ठाकरे यांनी पार पडली.